संजय राऊत यांनी नवनीत राणांना २०१९ मध्ये घडलेल्या घटनेची करुन दिली आठवण

0

मुंबई,दि.२४: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी खासदार नवनीत राणा (navneet rana) यांना २०१९ मध्ये घडलेल्या एका घटनेची आठवण करुन देत टिका केली आहे. हनुमान चालिसा पठणावरून राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं. त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले. मातोश्रीवर येऊनच दाखवा, असं प्रतिआव्हान शिवसैनिकांनी दिलं. काल संध्याकाळी राणा दाम्पत्याला अटक झाली. कालची रात्र राणा दाम्पत्याला कोठडीत काढावी लागली.

बोगस जातप्रमाणपत्रावर खासदार झालेल्या नवनीत राणा कोणाच्या सांगण्यावरून वातावरण पेटवत आहेत, याची सगळ्यांना कल्पना आहे, असं संजय राऊत म्हणाले. राऊतांचा रोख भाजपकडे होता. राऊत यांनी राणांना तीन वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची आठवण करून दिली. त्यावेळी लोकसभेत भाजपच्या खासदारांनी ‘जय श्रीराम’ घोषणा दिल्या. त्यावर अमरावतीच्या खासदार राणा यांनी आक्षेप घेतला.

संसदेत खासदारकीची शपथ घेत असताना जय श्रीरामच्या घोषणा देण्यात काही अर्थ नाही. ही योग्य जागा नाही. अशा घोषणा देण्यासाठी मंदिरं आहेत. सगळे देव समान आहेत. मात्र एका देवाच्या नावानं घोषणा देणं चुकीचं आहे, असं राणा म्हणाल्या होत्या. १७ जून २०१९ रोजी हा संपूर्ण प्रकार घडला. पश्चिम बंगालमध्ये जय श्रीरामच्या घोषणांवरून वातावरण तापलं. त्याचे पडसाद संसदेत उमटले होते आणि भाजप खासदारांनी जय श्रीरामच्या घोषणा देत शपथ ग्रहण केली होती.

राणांचं स्पष्टीकरण

तुम्ही संसदेत जय श्रीरामच्या घोषणांना विरोध केला आणि आता हनुमान चालिसा पठणावरून आक्रमक भूमिका घेत आहात, याबद्दल काय सांगाल, असा प्रश्न राणांना काल पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. त्यावर संसद सार्वभौमतेचं प्रतिक आहे. तिथं कोणत्याही धर्माशी निगडीत घोषणाबाजी होऊ नये अशी माझी भूमिका होती. हिंदू धर्माच्या घोषणांना विरोध नव्हता. धार्मिक घोषणा अशा ठिकाणी नकोत, इतकंच मला वाटतं होतं, असं स्पष्टीकरण राणांनी दिलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here