कोल्हापूर,दि.29: Sanjay Raut meet Shahu Chhatrapati: शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शाहू छत्रपती ( Shahu Chhatrapati) यांची कोल्हापुरात भेट घेतली आहे, यावेळी त्यांच्याबरोबर शिवसेनेचे राज्यसभेचे उमेदवार संजय पवार यांनी शाहू महाराजांची भेट घेतली. शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhtrapati) यांना शिवसेनेत प्रवेश करण्याच्या अटीवर राज्यसभेची उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेत प्रवेश नाकारला. शिवसेनेने दिलेला शब्द पाळला नाही असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले होते.
शाहू छत्रपती (Chhtrapati Shahu Maharaj) म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर संभाजीराजेंनी स्वराज्य संघटना काढली. त्यामुळे स्वत:च्या बळावर पुढे जाणे किंवा इतर पक्षाचा पाठिंबा घेणे हे दोन पर्याय संभाजीराजेंकडे होते. मागील वेळी राष्ट्रपती नियुक्त खासदारकी घेतानाही आम्ही त्यांना ती घेऊ नये असं मत मांडले होते. परंतु त्यांनी वैयक्तिक तो निर्णय घेतला. त्यानंतर आतापर्यंत त्यांनी राजकीय जी पाऊले उचलली आहेत. त्यात कुठेही आमच्याशी अथवा घरच्यांशी चर्चा केली नाही. यात छत्रपती घराणं कुठे येत नाही. त्यामुळे हा छत्रपती घराण्याचा अपमान आहे असं म्हणता येणार नाही असा खुलासा त्यांनी केला आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर राज्याच घडामोडींनी वेग आला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली. कोल्हापुरातील न्यू पॅलेस येथे आज संजय राऊत आणि शिवसेनेचे राज्यसभेचे उमेदवार संजय पवार यांनी शाहू महाराजांची भेट घेतली. शाहू महाराज आणि संजय राऊतांच्या भेटीने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.
त्याचसोबत संजय पवार यांचे शिवसेनेकडून नाव जाहीर होताच स्वत: छत्रपती शाहू महाराजांनी फोन करून त्यांचे अभिनंदन केले. संजय पवार यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला, जो अनेक वर्ष पक्षासाठी झटत होते त्यांना संधी देण्याचं काम शिवसेनेने केले त्याचा आनंद असल्याचं मत छत्रपती शाहूंनी व्यक्त केलं. तसेच शिवसेनेने दिलेला शब्द फिरवला असंही म्हणता येत नाही असं त्यांनी म्हटलं.
या सगळ्या घडामोडीनंतर आज संजय राऊत आणि संजय पवार यांनी शाहू महाराजांची भेट घेतली आहे. कोल्हापुरातील न्यू पॅलेस येथे आज संजय राऊत यांनी शाहू महाराजांची भेट घेतली. या दोघांमध्ये कोणत्या विषयांवर चर्चा झाली हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. यावेळी शिवसेनेचे राज्यसभेचे अधिकृत उमेदवार संजय पवारहे देखील उपस्थित होते. त्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, यावेळी संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत आमच्या भेटीमागे कोणतेही राजकारण नसून कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं स्पष्ट केलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरुन मी आज शाहू महाराजांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनीही महाराजांसोबत फोनवरुन संवाद साधला आहे. छत्रपती घराण्याचे आणि ठाकरे घराण्याचे जुने नाते आहे. प्रबोधनकार ठाकरेंपासून छत्रपती घराण्याचे जुने संबंध आहेत. आमच्या या भेटीमागे कोणतेही राजकारण नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वतः शाहू महाराजांसोबत चर्चा केली. उद्धव ठाकरेंनी महाराजांना फोनवर मी स्वत: कोल्हापुरात येईन असं सांगितलं आहे. महाराष्ट्रातील आमच्या सामाजिक कार्यात आपल्या शुभेच्छा, आशीर्वाद राहू देत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.