Sanjay Raut: ईडी म्हणजे भाजपसाठी एटीएम मशिन, लवकरच ईडीचे अधिकारी तुरुंगात जाणार: संजय राऊत

0

मुंबई, दि.8: Sanjay Raut: शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुंबईतील शिवसेना भवनात पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत भाजपावर (BJP) जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होईपर्यंत मुंबईतील प्रत्येक वॉर्डात आणि शिवसेनेच्या शाखांमध्ये आयकर खात्याच्या धाडी पडत राहतील, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावेळी केले.

“आज मी सकाळपासून आमच्या कार्यकर्त्यांवर प्राप्तिकर विभागाची धाड पडल्याच पाहत आहे. महापालिकेच्या निवडणुका होत नाहीत तोपर्यंत मुंबईच्या प्रत्येक विभागात आणि शाखेत प्राप्तिकर विभागाची धाड पडेल असे मला वाटत आहे. आता या विभागाकडे हेच काम शिल्लक राहिले आहे. केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रात आणि बंगालमध्ये फक्त ठरावीक लोकांनाच लक्ष का करत आहेत आहे प्रश्न देशभरातून विचारला जात आहे. शिवसेनेच्या नेतृत्वातील हे महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी हे मोठे षड्यंत्र आहे,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

ईडी म्हणजे भाजपसाठी एटीएम मशिन आहे, ईडीचे एक नेटवर्क देशातील खंडणी गोळा करण्याच्या कामात व्यस्त असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या प्रकरणी मुंबई पोलीस आजपासून तपास सुरू करत असून लवकरच ईडीचे काही अधिकारी तुरुंगात जातील असा इशाराही त्यांनी दिला आहे.

पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणा ईडी (ED) आणि इन्कम टॅक्सच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, खासदार संजय राऊत म्हणाले की, “ईडीकडून 100 हून जास्त व्यावसायिकांना धमकावलं जातं आणि त्यांच्याकडून खंडणी वसुल केली जाते. जितेंद्र नवलानी हा व्यक्ती ईडीचे हे रॅकेट चालवतो. नवलानी हा कन्सल्टन्सी कंपनी चालवतो पण त्याच्या कार्यालयात कोणताही कर्मचारी नाही, मग तो कोणती कंपनी चालवतो. ईडी हे भाजपसाठी एटीएम मशीनप्रमाणे काम करत आहे.”

“प्राप्तिकर विभागाला आणि ईडीला आम्ही आतापर्यंत पुराव्यासोबत 50 नावे पाठवली आहेत. यावर चौकशी करावी असे या तपास यंत्रणांना का वाटत नाही? किरीट सोमय्यांनी एका केंद्रीय मंत्र्यांच्या बोगस कंपन्यांची यादी ईडीला दिली आहे. भाजपाच्या जवळचे असणाऱ्या ढवंगाळे यांच्या 75 बोगस कंपन्यांची यादी मी ईडीकडे पाठवली होती. ईडीच्या सर्वात जास्त कारवाया या महाराष्ट्रात होत आहेत. महाविकास आघाडीच्या 14 प्रमुख नेत्यांवर ईडीने कारवाई केली आहे. भाजपा नेत्यांवर कोणत्याही तपास यंत्रणांची कारवाई झालेली नाही. ते लोक मुंबईच्या रस्त्यांवर वाटी घेऊन भीक मागत आहेत का? इनकम आणि टॅक्स फक्त आमच्याचकडे आहे का? या सर्व कारवाया कोण नियंत्रीत करत आहे याबाबत शिवसेना लवकरच मोठा खुलासा करणार आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

“मागच्या पत्रकारिषदेमध्ये मी सुमीत कुमार नरवर यांच्या नावाचा उल्लेख केला होता. बुलंदशहरमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीची संपत्ती आठ हजार कोटींच्यावर गेली आहे. आता ती व्यक्ती मलबार हिलला राहत आहे. ईडीला लावलेल्या चष्म्यातून अशा व्यक्ती दिसत नाही आहेत. याची माहिती मी लवकरच तुम्हाला देईल. दिल्ली आणि महाराष्ट्राच्या कोणत्या भाजपाच्या नेत्याची संपत्ती त्याच्याकडे आहे हे मी आधी पंतप्रधानांना सांगणार आणि त्यानंतर तुम्हाला. ट्रायडेन्ट ग्रुपला आधीच्या सरकारच्या काळात महत्त्वाची कामे मिळत होती त्याची माहितीही माझ्याकडे आहे. ही माहिती मी तपास यंत्रणांना देणार आहे. त्यानंतर तुम्ही मला अटकही करु शकता,” असेही संजय राऊत म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here