संजय राऊत यांची चित्रा वाघ यांच्यावर टीका; काही भाजपा नेत्यांचे मेंदू किड्या-मुंग्याचे

0

मुंबई,दि.१६: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपा नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वक्तव्य केलं होतं. ज्या घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाला. त्या महाराष्ट्रात हे घडणं दुर्दैवी आहे असं विधान शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊतांनी केले होते. त्यावरून भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ट्विट करत राऊतांवर घणाघाती टीका केली होती. स्वत:ला सर्वज्ञानी समजणारे यांचं अगाध ज्ञान समोर आले असं वाघ यांनी म्हटलं होते. त्यावर आता संजय राऊतांनीही प्रत्युत्तर दिले आहे. 

संजय राऊत यांचे स्पष्टीकरण

खासदार संजय राऊत म्हणाले की, भाजपाच्या काही नेत्यांचे मेंदू किड्या मुंग्याचे आहेत हे दुर्देवाने म्हणावं लागतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र नाहीत का? जन्म देशातच झालाय. १८९१ साली महू भागात जे आता मध्य प्रदेशात आहे. तेव्हा मध्य प्रदेश नव्हतं. भाषिक राज्य कधी निर्माण झाली याचा अभ्यास करावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला तेव्हा देशात कुठलेही राज्य नव्हते असं स्पष्टीकरण त्यांनी दिले. 

sanjay raut

मुंबई एकच प्रांत होता

त्याचसोबत देशात त्यावेळी एकच मुंबई प्रांत होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्र सुपुत्र आहेत हे ज्यांना कळत नाही तर अजूनही त्यांची डॉ. आंबेडकरांविषयी काय भावना होती हे दिसतं. भाजपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अभिमान नाही. वारंवार छत्रपतींचा अपमान, आंबेडकरांचा अपमान, फुले शाहू आंबेडकरांचा अपमान करताय असा आरोपही राऊतांनी भाजपावर केला. 

चित्रा वाघ काय म्हणाल्या होत्या?

रोज सकाळी महाराष्ट्राला ज्ञान देणारे सर्वज्ञानी इतके अज्ञानी असतील याचे दर्शन महाराष्ट्राला झालं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात नाही तर मध्यप्रदेशातील महू इथं झाला. इतकं सामान्य ज्ञान असू नये? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीची माहिती देऊन काय मिळवताय? राष्ट्रपुरुषांचा अपमान तुम्ही करायचा आणि मोर्चेही तुम्ही काढायचे. मुर्ख बनवू नका, महाराष्ट्र तुम्हाला पुरता ओळखून आहे अशी टीका चित्रा वाघ यांनी केली होती. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here