शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणूकीत दगाबाजी करणाऱ्यांची नावे केली जाहीर

0

मुंबई,दि.11: महाराष्ट्रातील राज्यसभेसाठी 6 जागांवर झालेल्या निर्णयानुसार महाविकास आघाडीचे 3 तर भाजपचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत. सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीला धक्का बसला. या जागेवर भाजपचे धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव केला. राज्यसभेच्या निकालावर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीला मतं न देणाऱ्यांची नावं जाहीर केली आहेत. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजपच्या धनंजय महाडिकांनी बाजी मारली. महाडिकांच्या या विजयामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आखलेली खेळी यशस्वी ठरली आहे.

आमच्या मित्रपक्षांनी आमच्याशी दगाबाजी केली नाही. घोडेबाजार उभे होते त्यांची सहा सात मतं आम्हाला मिळाली नाहीत. आम्ही कोणत्या व्यवहारात पडलो नाही. आणि कुठला व्यापार केला नाही. तरीही संजय पवार यांना पहिल्या पसंतीची 33 मतं मिळाली. हा सुद्धा आमचा एक विजय आहे. ज्या कुणी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची यादी आमच्याकडे आहे. बहुजन विकास आघाडीचे तीन आमदारांची तीन मतं आम्हाला मिळाली नाहीत. करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, लोह्याचे आमदार शामसुंदर शिंदे, स्वाभिमानीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मतं दिली नाहीत, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

संजय राऊत म्हणाले की, ज्या कारणासाठी सुहास कांदे यांचं मत बाद केलं. त्याच कारणासाठी आम्ही सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आक्षेप घेतला. मात्र फक्त कांदेंचं मत अवैध ठरवलं. रवि राणा यांनी देखील जे कृत्य केलं होतं त्यांचंही मत अवैध व्हायला हवं होतं, असंही राऊत म्हणाले. इतर मतंही बाद करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण तो डाव आम्ही हाणून पाडला असंही राऊत म्हणाले. आम्ही खबरदारी आधीही घेतली होती, आताही घेऊ, फक्त आम्ही घोडेबाजार केला नाही, असं राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले की, घोडेबाजारातील घोड्यांमुळं सरकारवर फरक पडणार नाही. फार हरभऱ्याच्या झाडावर चढू नका, हरभरे अपक्षांनी खाल्ले आहेत, असा टोलाही राऊतांनी विरोधकांना लगावला. समोरच्यांनी केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासला. घोडेबाजार जे विकले गेले त्यांची नोंद झाली आहे. काही लोकांनी शब्द देऊन फसवणूक केली. शिवसेनेला कोणताही झटका लागलेला नाही. मात्र हा काही भाजपचा मोठा विजय नाही, असंही ते म्हणाले. आम्ही निसरड्या वाटेवर होतो. ज्या लोकांनी शब्द दिला ते शब्द पाळतील असे वाटले पण त्यांनी ते पाळले नाहीत, असंही ते म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here