Sanjay Raut: संजय राऊत आणि त्यांच्या निकवर्तीयानी कोव्हिड सेंटर्सच्या माध्यमातून केला १०० कोटींचा भ्रष्टाचार: किरीट सोमय्या

0

मुंबई,दि.५: भारतीय जनता पार्टीचे (BJP) नेते माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर १०० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. सुजीत पाटकर (Sujit Patkar) हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत. सुजित पाटकर यांनी बनावट कंपनीच्या माध्यमातून कोव्हिड सेंटर्समध्ये डॉक्टर्स पुरवण्याचे कंत्राट घेतले होते. मुंबई महानगरपालिकेने सुजीत पाटकर यांना शहरातील कोव्हिड सेंटर्समध्ये डॉक्टर्स पुरवण्याचे कंत्राट दिले होते. सक्तवसुली संचलनालयाने (Enforcement Directorate) सुजीत पाटकर यांच्या मालमत्तांवर टाकलेल्या छाप्यावेळी मुंबईतील कोव्हिड केंद्रांविषयीची कागदपत्रे जप्त केल्याचे समजते. त्यामुळे आता ‘ईडी’ काय कारवाई करणार, हे पाहावे लागेल.

कोव्हिड सेंटर्सच्या १०० कोटींच्या भ्रष्टाचाराची चौकशी ‘ईडी’कडून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली. सुजीत पाटकर यांनी बनावट कंपनी स्थापन करुन मुंबईतील कोव्हिड सेंटर्समध्ये डॉक्टर्स पुरवण्याचे कंत्राट मिळवले होते. दहिसर, वरळी, महालक्ष्मी रेसकोर्स आणि मुलूंड येथील कोव्हिड केंद्रांवर सुजीत पाटकर यांच्या कंपनीच्या माध्यमातून डॉक्टर्स पुरवले जायचे. या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले. सुजीत पाटकर हे संजय राऊत यांचे वाइन व्यवसायातील भागीदार असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. संजय राऊत यांच्या मुली पुर्वशी आणि विधिता संचालक असलेल्या कंपनीत सुजीत पाटकर भागीदार असल्याची माहिती आतापर्यंत समोर आली आहे. या सगळ्या आरोपांनंतर आता संजय राऊत काय स्पष्टीकरण देतात, हे पाहावे लागेल.

यापूर्वी ईडीने संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि उद्योजक प्रवीण राऊत यांना अटक केली होती. गोरेगाव भूखंडाच्या विक्रीत एफएसआयमध्ये गैरव्यवहार केल्याच्या आरोपांखाली मनी लांड्रिंगचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना ही अटक करण्यात आली होती. प्रवीण राऊत यांच्यावर १ हजार ३४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. ईडीच्या पथकाने मंगळवारी प्रवीण राऊत यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी झडती घेतली होती. त्यानंतर त्यांना दक्षिण मुंबईतील कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले होते. त्यांची अनेक तास चौकशी केली. मात्र, चौकशीला सहकार्य करण्यास नकार दिल्यानंतर ईडीने प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आली होती.

वाइन उद्योगात संजय राऊतांची मोठी गुंतवणूक

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यापूर्वीही संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची वाइन उद्योगात मोठी गुंतवणूक असल्याचा आरोप केला होता. संजय राऊत यांच्या परिवाराने १६ एप्रिल २०२१ मध्ये उद्योजक अशोक गर्ग यांच्याशी भागीदारी केली. त्यानंतर १२ जानेवारी २०२२ रोजी अशोक गर्ग यांच्या कंपनीने आपले नाव आणि व्यवसायाचे स्वरुप बदलत असल्याची माहिती कंपनी मंत्रालयाला दिली. या कंपनीचे नाव पूर्वी मादक होते. त्यानंतर या कंपनीचे नाव बदलून मॅक पी, असे ठेवण्यात आले. अशोक गर्ग हे २०१० पासून दोन कंपन्या चालवतात. यापैकी एक कंपनी वाइन वितरणाचा व्यवसाय करते. मुंबई आणि पुणे परिसरातील हॉटेल्स, क्लब आणि पबमध्ये अशोक गर्ग यांच्या कंपनीकडून वाइन पुरवली जाते. या व्यवसायात अशोक गर्ग यांच्या कंपनीची एकाधिकारशाही आहे. अशोक गर्ग यांच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल साधारण १०० कोटी इतकी आहे. १६ एप्रिल २०२१ रोजी संजय राऊत यांनी अशोक गर्ग यांच्याशी भागीदारी केली. त्यांच्या कन्या विधिता आणि पूर्वशी राऊत या दोघीही कंपनीत भागीदार आहेत. संजय राऊत यांनी आपल्या हितसंबंधांची माहिती जाहीर करायला हवी होती, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here