सांगली,दि.24: Sanjay Patil On Jayant Patil: भाजपा खासदार संजय पाटील यांनी जयंत पाटील यांच्यासंदर्भात मोठा दावा केला आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांचा (Jayant Patil) लवकरच भाजपात प्रवेश होईल, असं वक्तव्य संजयकाका पाटील यांनी केलंय. तसा भाजपाचा होकायंत्राचा इशारा असल्याचंही संजय पाटील म्हणाले. मिरजेमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमाप्रसंगी खासदार संजय पाटील यांनी हे वक्तव्य केलंय. यावेळी भाजपचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्यासह भाजपाचे नगरसेवक उपस्थित होते.
खासदार संजय पाटील यांचा जयंत पाटील यांच्यासंदर्भात मोठा दावा | Sanjay Patil On Jayant Patil
जयंत पाटील भाजपात येतील असे संकेत सांगलीचे भाजपा खासदार संजय पाटील यांनी दिले आहेत. भाजपाच्या होकायंत्रांचा इशारा असून लवकरच त्यांचा प्रवेश होईल, अशी दिशा धरुया अशा शब्दात खासदार संजय पाटील यांनी सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सध्या महापालिका क्षेत्रातील जयंत पाटील गटाचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजित पवारांच्या गटात दाखल झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये जयंत पाटील कुठे जाणार? चर्चा सुरू आहेत. यावरून भाजपचे खासदार संजय पाटील यांनी जयंत पाटील आता कुठे जाणार असा प्रश्न उपस्थित करताना जयंत पाटील यांचा भाजपा प्रवेश होईल, असे संकेत दिले आहेत.
दरम्यान खासदार संजय पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. सांगलीतले लोकल नेते काही बोलले असतील तर त्यात काही तथ्य नाही, राष्ट्रवादी काँग्रेस हे पवार साहेब यांचं कुटुंब आहे असं रोहित पवार म्हणाले.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार यांच्यासोबत अनेक बडे नेते गेले, पण जयंत पाटील मात्र शरद पवार यांच्यासोबतच राहिले. मध्यंतरी जयंत पाटील हे अजित पवार गटासोबत जाणार असल्याच्या चर्चा होत्या. पण त्या अफवा असल्याचं त्यावेळी जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं होतं. पुण्यामध्ये उद्योगपती चोरडिया यांच्या निवासस्थानी अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्या भेटीवेळी त्या ठिकाणी जयंत पाटीलही उपस्थित होते. त्यानंतरही जयंत पाटील यांच्या भूमिकेविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटाकडून शरद पवारांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र, जेव्हा अजित पवार गटाकडून शरद पवारांची भेट घेण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा जयंत पाटील यांना सोबत घेऊनच चर्चा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील अजित पवार गटात जाणार असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यात जयंत पाटील यांनी भेट घेतल्याचीही चर्चा रंगली होती. मात्र, जयंत पाटलांनी या सर्व चर्चांचे खंडन केले आहे.
सांगली जिल्हा हा जयंत पाटलांचा बालेकिल्ला समजला जातो. जिल्ह्यातील सत्ता स्थानांवर त्यांच्याच गटाचे सर्वाधिक प्राबल्य आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीला खिंडार पाडल्यानंतर कमी अधिक प्रमाणात सर्वच जिल्ह्यात त्याचे पडसाद उमटले, पण सांगली राष्ट्रवादीमध्ये कोणताही धक्का पोहोचलेला नाही.