सांगली,दि.२६: भक्ती आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली निष्पाप भावनांशी खेळणाऱ्या भोंदूगिरीचा आणखी एक काळिमा फासणारा चेहरा सांगलीत उघड झाला आहे. नाशिकमधील खरात प्रकरणामुळे राज्य आधीच ढवळून निघालेलं असताना, विट्यातील ‘कडेश्वर धाम’ नावाच्या कथित आध्यात्मिक केंद्रात अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा गैरफायदा घेतल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. अंगात देव येत असल्याचा आव आणणाऱ्या तीन भोंदू बाबांनी पुनर्जन्माची खोटी कथा रचून एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. याप्रकरणी पोलिसांनी पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे फिरवली आहेत.
पुनर्जन्माचा सापळा आणि ‘नाग-नागीण’ कथा
स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणवून घेणाऱ्या या नराधमांनी पीडितेच्या कुटुंबाच्या अंधश्रद्धेचा पुरेपूर गैरफायदा घेतला. मुलीला जाळ्यात ओढण्यासाठी त्यांनी थेट तिच्या पूर्वजन्माचा काल्पनिक दाखला दिला.
“तू मागच्या जन्मी नागीण होतीस आणि आमचा संकेतबाबा नाग होता. तुमचं हे नातं पूर्ण करण्यासाठीच तुझा हा जन्म झालाय,” असा अजब आणि मानसिक दबाव टाकणारा दावा या भोंदूंनी केला.
या भ्रामक कथेच्या आहारी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विश्वास संपादन करून, तिला विळख्यात घेण्यात आले.
त्रिकुटाकडून चौफेर शोषण
एकदा मुलगी जाळ्यात अडकल्यावर या तिघांनी तिच्या असहायतेचा क्रूर गैरफायदा घेतला. अध्यात्माच्या नावाखाली पीडितेवर वारंवार शारीरिक अत्याचार करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे, पोलिसांनी व्यक्त केलेल्या संशयानुसार हे केवळ लैंगिक शोषणापुरतं मर्यादित नव्हतं; तर त्या मुलीचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि मानसिक खच्चीकरणही या त्रिकुटाने केलं आहे.
अंधश्रद्धेच्या बाजारावर पुन्हा प्रश्नचिन्ह
नाशिकच्या घटनेनंतर राज्यातील जनतेमध्ये भोंदू बाबांविरोधात प्रचंड संताप असतानाच या नव्या प्रकरणामुळे कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. विटा पोलिसांनी या प्रकरणी अत्यंत गांभीर्याने तपास सुरू केला असून, ‘कडेश्वर धाम’च्या नावाखाली चालणाऱ्या या काळ्या धंद्यात आणखी किती निष्पाप बळी गेले आहेत, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.








