राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे एकत्र येण्यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांचे मोठे वक्तव्य

0

मुंबई,दि.4: राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांच्यासंदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्राचं राजकारण गेल्या वर्षभरात घडलेल्या दोन मोठ्या घटनांनी अक्षरशः ढवळून निघालं. अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजपच्या मदतीनं काही आमदारांच्या समर्थनासह उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा ट्वीस्ट आला. अशातच आता राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकत्र यावं, अशी चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. काल (3 जुलै) झालेल्या मनसेच्या बैठकीतही मनसे पदाधिकाऱ्यांनी हाच सूर आवळला होता, तसेच याच आशयाचे बॅनर्सही झळकले होते. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उद्धव ठाकरेना दोन वेळा एकत्र येण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता, असं वक्तव्य मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे.

एबीपी माझाशी बोलताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितलं की, “मनसेने दोन वेळा उद्धव ठाकरेंना एकत्र येण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, ठाकरे गटाने मनसेचा प्रस्ताव फेटाळला होता.” तसेच, आम्ही हात पुढे केला होता मात्र ठाकरेंनी टाळी टाळली. लोकांच्या भावनांचा आम्ही आदर करतो, मात्र अंतिम निर्णय राज ठाकरे घेतील, असंही संदीप देशपांडे म्हणाले.

संदीप देशपांडे म्हणाले की, लोकांच्या भावनांचा आम्ही आदर करतो. 2014 आणि 2017 या दोन्ही वर्षी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव दिला होता. पण ठाकरेंकडून टाळाटाळ करण्यात आली. हो किंवा नाही, असं कोणतंही स्पष्ट उत्तर दिलं गेलं नाही. ऐनवेळी माघार घेतली. पुढे बोलताना ते म्हणाले की, राजकारणात युती किंवा आघाडी ही सगळी समीकरणं गरजेतून घडतात. आता सध्या गरज आहे का? याचा विचार पक्ष नेतृत्त्व करत असतं.

लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंची साथ देऊया असा सूर उमटला. याआधी 2017 च्या महापालिका असो किंवा त्यानंतरच्या विधानसभा निवडणुका त्यावेळीही दोन्ही ठाकरे एकत्र येण्याबाबत चर्चा रंगली होती. तेव्हा राज ठाकरे यांनी उघडपणे हात पुढे केला होता, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला नव्हता. स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून राज ठाकरेंकडे विनंती केली की आता वेळ बरोबर आहे. मराठी माणासांची अस्मिता जपण्यासाठी ठाकरेंनी एकत्र यावं अशी जनभावना आहे. कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे यावर विचार करायला हवा, अशी विनंती करण्यात आली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here