समीर वानखेडे यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू, एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी दिली महत्वाची माहिती

0

दि.२५: अंमली पदार्थप्रकरणी क्रूझ पार्टीत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला पकडलं. यानंतर आर्यन खानसोबतचा सेल्फी काढल्याने किरण गोसावी चर्चेत आला. किरण गोसावीच्या खासगी बॉडीगार्डने ही एका व्हायरल व्हिडिओद्वारे धक्कादायक माहिती दिली आहे. या प्रकरणात लाखोंची डील झाल्याचा दावा गोसावीच्या खासगी बॉडीगार्डने केला आहे. क्रूझवरील छाप्यावेळी २ ऑक्टोबरला काय घडलं. त्यावेळी आपणही किरण गोसावीसोबत होतो, आसा दावाही त्याने केला आहे. प्रभाकर साईल हा अंमली पदार्थप्रकरणी क्रमांक १ चा साक्षीदार आहे.

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील एक पंच साक्षीदार प्रभाकर साईल याने प्रतिज्ञापत्र प्रसिद्ध करत एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर थेट खंडणीवसुलीचा आरोप केल्याने खळबळ उडाली असून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. वानखेडे यांच्यावरील आरोपांची तातडीने खात्यांतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. याबाबत एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. वानखेडे पदावर राहणार की नाहीत, या प्रश्नावरही सिंह यांनी उत्तर दिलं.

आर्यन खान याची सुटका करण्यासाठी अभिनेता शाहरुख खान याच्याकडे २५ कोटींची मागणी करण्यात आली, असा दावा प्रभाकर साईल याने केला आहे. यापैकी ८ कोटी रुपये समीर वानखेडे यांना दिले जाणार होते. याबाबतचं किरण गोसावीचं संभाषण मी ऐकलं, असा दावा साईल याने प्रतिज्ञापत्रात केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली असून एनसीबीने याची तातडीने दखल घेत समीर वानखेडे यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू केली आहे. एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्या देखरेखीखालीच ही चौकशी करण्यात येत असून या अनुषंगाने सिंह यांनी माध्यमांकडे महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

‘एका स्वतंत्र पंच साक्षीदाराने प्रतिज्ञापत्राद्वारे काही माहिती सोशल मीडियात प्रसिद्ध केली आहे. त्याची स्वत:हून दखल घेऊन एनसीबी महासंचालकांनी दक्षता विभागाला चौकशीचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात जसजशी चौकशी होईल तशी आपणास माहिती देण्यात येईल’, असे ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले. चौकशी सुरू करण्यात आली आहे तर समीर वानखेडे यांना हटवले जाणार का, असे विचारले असता ते पदावर राहणार की नाहीत याबाबत आताच काही सांगता येणार नाही, असे सिंह म्हणाले. याबाबत आजच चौकशीचे आदेश झालेले आहेत. त्यामुळे वस्तुस्थिती आणि साक्ष यांच्या आधारावर येत्या काळात योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. एनसीबी ही एक पारदर्शक तपास यंत्रणा आहे. चौकशी असू देत नाहीतर तपास असोत आम्ही ती बाब प्रोफेशनली हाताळत असतो आणि याप्रकरणातही जे सत्य आहे त्या आधारावरच सगळ्या गोष्टी होतील आणि निश्चितपणे एका निष्कर्षापर्यंत आम्ही पोहचू, असे सिंह यांनी सांगितले.

दरम्यान, एनसीबीच्या मुंबई कार्यालयातून संपूर्ण प्रकरणाचा तपशील मेलद्वारे एनसीबीचे महासंचालक सत्यनारायण प्रधान यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. त्याचवेळी समीर वानखेडे हे दिल्लीला जाण्यासाठी मुंबईतून रवाना झाले आहेत. एनसीबीच्या आढावा बैठकीसाठी ते दिल्लीत जात असल्याचे सांगितले जात आहे. या दिल्ली भेटीत महासंचालक प्रधान हे वानखेडे यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत त्यांची बाजू ऐकून घेण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे वानखेडे यांच्यावर मुंबई पोलीस अटकेची कारवाई करतील ही शक्यता लक्षात घेत त्यांची महाराष्ट्राबाहेर बदली करण्याच्या हालचालीही सुरू झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here