एनसीबीचे समीर वानखेडे यांचे जोरदार स्वागत, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार

0

मुंबई,दि.३: मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणावर कारवाई केल्यापासून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोप करत आहेत. एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ आता हिंदुत्ववादी संघटना पुढं येऊ लागल्या आहेत. ‘शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान’ या संघटनेनं आज एनसीबीच्या कार्यासमोर समीर वानखेडे यांचा जाहीर सत्कार केला. त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा त्यांना भेट देण्यात आली.

‘समीर वानखेडे तुम आगे बढो…हम तुम्हारे साथ है’, ‘हर हर महादेव’ या घोषणांनी एनसीबी कार्यालयाबाहेर शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी वानखेडेंचा सत्कार केला. तसंच ड्रग्ज माफियांच्या विरोधात कारवाई करुन समीर वानखेडे चांगलंच काम करत आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका करुन त्यांचं खच्चीकरण करण्याचं काम काही जण करत आहेत. पण आम्ही त्यांच्यासोबत असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही इथं आलो आहोत, असं शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यानं सांगितलं.

समीर वानखेडे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना पाठिंबा द्यायला हवा, असं ‘शिवप्रतिष्ठान’चे नितीन चौगुले यांनी सांगितलं. ‘नवाब मलिक हे वानखेडे यांच्यावर व्यक्तिगत आरोप करत आहेत. त्यांचं खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे. नवाब मलिक यांच्यासारख्या मंत्र्यांना आमचा विरोध आहे. त्यांच्या विरोधात आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करत राहू, असंही चौगुले यांनी सांगितलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here