नवी दिल्ली,दि.27: कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरण (cordelia cruise drug case) केंद्र सरकारने समीर वानखेंडेंच्या (Sameer Wankhede) बाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात NCB ने या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे, ज्यामध्ये आर्यन आणि इतर पाच जणांना क्लीन चिट देण्यात आली आहे, त्यांची नावे आरोपपत्रात नाहीत. त्याचाच अर्थ आर्यनला NCB ने क्लीन चिट दिली आहे.
मुंबई कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा निकाल लागला असला तरी तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास त्यांनी चुकीच्या पद्धतीने केला असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याची शक्यता आहे. सरकारने वरिष्ठ अधिकाऱ्यांना वानखेडे यांच्याविरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
समीर वानखेडे यांच्यावर बनावट जात प्रमाणपत्रक जमा केल्याप्रकरणी या अगोदरच एक गुन्हा नोंद आहे, त्या प्रकरणी कारवाई सुरू आहे. त्यात आता आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट देण्यात आलं आहे. आर्यन खानला या प्रकरणात तुरुंगात जावं लागलं होतं. आता त्याला क्लीन चिट देण्यात आल्याने या प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणात वानखेडे यांच्या टीमकडून चुकी झाल्याचं समोर आलं आहे. आर्यन खानला अटक करण्यात आलं त्यावेळी या प्रकरणाचा संपूर्ण तपास हा समीर वानखेडे करत होते.
या प्रकरणात एनसीबीच्या व्हिजिलन्स टीमचा रिपोर्ट लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. या रिपोर्टनंतर समीर वानखेडे यांच्यासमोरील अडचणींमध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वानखेडे यांनी ज्या पद्धतीने या प्रकरणाचा तपास केला, त्यामध्ये अनेक चुका असल्याचं निदर्शनाला आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.