संभाजी ब्रिगेड आक्रमक, भाजपा व आरएसएसला दिला इशारा

यापुढे शिवरायांचा अवमान केला तर गुद्द्यांशिवाय पर्याय नाही, संभाजी ब्रिगेडचा इशारा

0

मुंबई,दि.1: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तुलनेवरून संभाजी ब्रिगेडने आक्रमक पवित्रा घेतला आहे. संभाजी ब्रिगेडने भाजपा व आरएसएसला इशारा दिला आहे. भाजपाचे नेते तथा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील सुटकेशी केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल केलेले वादग्रस्त टिप्पणी प्रकरण अद्याप ताजे असताना लोढा यांनी केलेल्या या तुलनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे.

संभाजी ब्रिगेडनेदेखील भाजपा तसेच लोढा यांचा निषेध व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे यापुढे शिवरायांचा अवमान केला तर गुद्द्यांशिवाय पर्याय नाही, असा थेट इशाराच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी दिला आहे.

“शिवप्रतापदिनाच्या निमित्ताने प्रतापगडावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भाजपाचे नेते तथा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बदनामीकारक विधान केले आहे. भाजपाच्या नेत्यांना काय झाले आहे, हे मला समजत नाहीये. वेळोवेळी छत्रपती शिवाजी महाराज तसेच अन्य महापुरूषांची बदनामी केली जात आहे. या बदनामीवर मूग गिळून बसल्याने चालणार नाही,” अशी प्रतिक्रिया आखरे यांनी दिली.

“शिवरायांशी मिंधे गटाच्या शिंदेंची तुलना केली जात आहे. याद राखा हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे. शिवाजी महाराज यांच्याकडून जगाला आणि देशाला प्रेरणा मिळते. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना जर फितुरांशी होत असेल तर ते निंदनीय आहे. छत्रपतींची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. येथून पुढे भाजपा असो किंवा आरएसएस असो, कोणाही शिवाजी महाराजांची बादनामी करण्याचा प्रयत्न केला तर गुद्द्यांशिवाय पर्याय राहणार नाही,” असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.

काय म्हणाले मंगलप्रभात लोढा?

किल्ले प्रतापगडावर शिवप्रतापदिन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते. तेव्हा बोलताना मंगलप्रभात लोढा म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेब बादशाहने आग्र्यात कैद करुन ठेवले होते. पण शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी बादशाहच्या हातावर तुरी देऊन तेथून निसटले. एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रासाठी तिकडून ( महाविकास आघाडी ) बाहेर पडले,” असं विधान मंगलप्रभात लोढा यांनी केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here