सोलापूर,दि.8: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेवर (Samarth Sahakari Bank Ltd. Solapur) निर्बंध घातले आहेत. समर्थ सहकारी बँक ही नावाजलेली बँक आहे. बँकिंग नियमन अधिनियम 1949च्या कलम 35(अ) आणि 56 नुसार पुढील सहा महिन्यासाठी बँकेच्या व्यवहारवर निर्बंध घालण्यात आले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने घातलेल्या निर्बंधामुळे बँक परवानगीशिवाय नवीन कर्ज देऊ शकणार नाही, ठेवी स्वीकारू शकणार नाही किंवा कोणतीही मालमत्ता विक्री अथवा हस्तांतर करू शकणार नाही.
RBI कडून समर्थ सहकारी बँकेच्या खातेदारांना आणि ठेवीदारांना त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. 7 अॅाक्टोबर 2025 पासून बँकेवर रिझर्व्ह बँकने निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध पुढील सहा महिन्यांसाठी लागू राहतील.
ठेवीदारांना DICGC योजनेअंतर्गत त्यांच्या ठेवीवर 5 लाखांपर्यंत ठेव विमा मिळू शकतो, असेही आरबीआयने प्रसिद्धी पत्रकामध्ये स्पष्ट केले आहे. DICGC अंतर्गत, प्रत्येक ठेवीदाराला ₹5,00,000 पर्यंत ठेव विमा सुरक्षा मिळेल. अधिक माहितीसाठी: [www.dicgc.org.in](http://www.dicgc.org.in)
RBIच्या निर्देशानुसार 7 ऑक्टोबरच्या व्यवहाराच्या समाप्तीपासून समर्थ बँक लेखी पूर्व मंजुरीशिवाय कोणतेही कर्ज आणि आगाऊ रक्कम मंजूर किंवा नूतनीकरण करू शकत नाही. कोणतीही गुंतवणूक करू शकत नाही. निधी उधार घेणे आणि नवीन ठेवी स्वीकारणे यासह कोणतेही दायित्व सहन करू शकत नाही. दायित्वे पूर्ण करताना किंवा अन्यथा कोणतेही पेमेंट वितरित करू शकत नाही किंवा वितरित करण्यास सहमती देऊ शकत नाही. कोणत्याही तडजोड किंवा व्यवस्था करू शकत नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.








