अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना 15 मार्चपर्यंत ईडी कोठडी

Sadanand Kadam: सदानंद कदम हे शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे बंधू आहेत

0

मुंबई,दि.11: दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांचे निकटवर्तीय, व्यावसायिक भागीदार शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम (Sadanand Kadam) यांना अटक केली. आज सदानंद कदम यांना हॉलिडे कोर्टात हजर केलं होतं. त्यावेळी ईडीच्या वकिलांनी त्यांनी 14 दिवसांची कोठडी मागितली. ज्यानंतर कोर्टाने त्यांना 15 मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले होते. विशेष म्हणजे कोर्टात ईडीच्या वकिलांनीही अनिल परब यांचं नाव घेतलं.

शुक्रवारी चार तास चौकशीनंतर कदम यांना ईडीने अटक केली होती. सदानंद कदम यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यांना अटक करण्यात आल्याचे ईडीने सांगितले आहे. तसेच ईडीने सादर केलेल्या पुराव्यात अनिल परब यांच्या खात्यातून एक कोटी रूपये विभा साठे यांना दिल्याचे उघड झाले आहे. तर सदानंद कदम यांच्या माध्यमातून ही रक्कम दिल्याचेही ईडीने म्हटलं आहे. ईडीचा युक्तिवाद कोर्टानं मान्य केला आहे. मात्र, ईडीची14 दिवसांच्या कोठडीची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे.

सदानंद कदम यांच्या वकिलांनी काय म्हटलं आहे? | Sadanand Kadam

आमचं म्हणणं असं होतं की सदानंद कदम यांना चुकीच्या पद्धतीने अटक केली आहे . ईडी म्हणणं असं होतं की आम्हाला चौकशी करण्याची गरज आहे . दोघांचं म्हणणं ऐकून कोर्टाने 15 मार्च पर्यंतची कस्टडी दिली आहे. त्यांना घरातून जेवण आणि मेडिकल प्रोव्हाइड केली जाईल. त्यांची चौकशी केली जाईल तेव्हा ॲडव्होकेट त्यांच्यासोबत हजर राहू शकतो ही सुद्धा कोर्टाने परवानगी दिली आहे. कोर्टाची ऑर्डर आल्यावर तुम्हाला त्यांची उत्तर नक्कीच मिळतील असं सदानंद कदम यांचे वकील निरंजन मुंगधी यांनी सांगितलं आहे.

कोर्टात ईडीने काय म्हटलं?

अनिल परब यांच्या सांगण्यावरुन सदानंद कदम यांनी विभास साठे यांच्यासोबत 80 लाखांचा व्यवहार केला. जवळपास 54 लाखात साई रिसॉर्टची बांधणी करण्यात आली. पण ऑन रेकॉर्ड त्याची किंमत साडेतीन कोटी रुपये दाखवण्यात आली. त्यामुळे हे सगळे पैसे नेमके कुठून आले? याचा तपास आम्हाला करायचा आहे. काही साक्षीदारांना समोरासमोर बसवून चौकशी करायची आहे. या सगळ्या प्रकारामध्ये खोलवर जाऊन तपास करायचा आहे, असा युक्तिवाद ईडीच्या वकिलांनी केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here