सांगली,दि.25: आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे. विरोधकांकडून सातत्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. आमदार सदाभाऊ खोत यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांना लक्ष्य केलं आहे. “बारामतीच्या गड्याच्या अंगात कसले पार्ट घातले होते हे मी मेल्यावर ब्रह्मदेवाला विचारणार,” अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. सांगलीतील आटपाडी तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेच्या कामाचा शुभारंभ, लोकार्पण सोहळा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार सदाभाऊ खोत, पृथ्वीराज देशमुख, राजेंद्र अण्णा देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी बनपुरी येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात खोत बोलत होते.
सदाभाऊ खोत म्हणाले की, “बारामतीच्या गड्याच्या अंगात कसले पार्ट घातले होते हे मी मेल्यावर ब्रह्मदेवाला विचारणार आहे. हा माणूस ब्रह्मदेवाला चुकवून खाली पळाला असणार. एवढा बिलंदर माणूस राजकारणात पाहायला मिळणार नाही.”
याचवेळी सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारकडे उपरोधिक मागणी केली. यंदा महाराष्ट्रभर हर्बल तंबाखूचा पेरा होऊ द्या, आम्हाला सरकारने हर्बल तंबाखूचे बियाणे द्यावे, एकदा आमची पण गरिबी हटू द्या, असं सदाभाऊ खोत म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जावयाकडे गांजा सापडला. यासाठी त्यांना तुरुंगवास देखील झाला. परंतु यावरु नवाब मलिक यांनी एनसीबी जोरदार हल्लाबोल केला. एनसीबीसारख्या केंद्रीय यंत्रणेला गांजा आणि हर्बल टोबॅको यातला फरक कळू नये ही बाब गंभीर असल्याचं ते म्हणाले होते. त्यावरुन नवाब मलिक यांना सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आलं. याच हर्बल टोबॅकोवरुन सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारची फिरकी घेत उपहासात्म टोला लगावला.