मुंबई,दि.१०: Sachin Waze Anil Deshmukh: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. १०० कोटी वसुली प्रकरणाने अडचणीत आलेले अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीने कारवाई केली आहे. मुंबईतील बार वसुलीप्रकरणी सचिन वाझेने (Sachin Waze) माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात मोठी खेळी केली आहे. वाझेने थेट ईडीलाच प्रस्ताव दिला असून मनी लाँड्रिंग प्रकरणी माफीचा साक्षीदार बनविण्याची मागणी केली आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सूचनेवरून एप्रिल २०२० मध्ये तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना, पुन्हा सेवेत घेण्यासाठी विनंती अर्ज पाठविल्याचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने ईडीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे. तसेच चांदिवाल समितीला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात वाझेने अनिल देशमुख यांच्या आदेशावरूनच मुंबईतील बार चालकांकडून पैसे वसूल करत होते, असे म्हटले आहे.
पोलिसांनी वांद्रे येथे प्रतिबंधित एन-९५ मास्कचा साठा जप्त केला. त्यात माझी मोठी भूमिका होती. मी निलंबित असतानाही मी काम केले आहे, असा दावा वाझे याने केला. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यावेळी देशव्यापी पत्रकार परिषदेला संबोधित केले होते. मी निलंबित असतानाही माझ्या कामगिरीवर ते आनंदी होते. त्यामुळे अनिल देशमुख यांनी माझे निलंबन रद्द करण्यात येईल, असे म्हणत मला तसा विनंती अर्ज तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना देण्यास सांगितले. त्यांनी दिलेल्या सूचनेचे मी पालन केले आणि ते रेकॉर्डवर आहे, असे वाझे यांनी ईडीला ११ डिसेंबर रोजी दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
तसेच या पैशांच्या अफरातफर, वसुली प्रकरणी मला माफीचा साक्षीदार बनविण्यात यावे, अशी मागणी एका पत्राद्वारे सचिन वाझेने केली आहे. अनिल देशमुख यांनी आपल्या परिवारातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती, असा दावाही वाझेने केला आहे. आज वाझे आणि अनिल देशमुख चांदिवाल आयोगासमोर हजर राहिले होते. तर देशमुख यांनी जामिनासाठी आज अर्जही केला आहे.
आरोपपत्रात परमबीर सिंह यांचाही जबाब जोडण्यात आला आहे. वाझे याला सेवेत रुजू करून घेण्यासाठी देशमुख यांनी दबाव आणला होता. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांच्याकडून तशा थेट सूचना होत्या, असे सिंह यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे. सिंह यांना मुंबई पोलीस आयुक्तपदावरून हटवण्यात आल्यावर त्यांनी देशमुखांच्या भ्रष्टाचाराबाबत पत्र लिहिले होते.