मुंबई,दि.9: Saamana ON Politics: दैनिक सामना अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली आहे. गुजरातसह देशातील काही राज्यांमधून मुलींचं बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलं असल्याची धक्कादायक माहिती नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालातून पुढे आली आहे. एकट्या गुजरातमधून गेल्या पाच वर्षात 40 हजार मुली बेपत्ता झाल्याचं या अहवालातून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, यावरून ठाकरे गटाने मोदी सरकारला लक्ष्य केलं असून या अहवालाने मोदी-शहांच्या कारभाराचे धिंडवडेच काढले असल्याची टीका ‘सामना’तून करण्यात आली आहे. तसेच ठाकरे गटाने यावरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारलाही लक्ष्य केलं आहे.
दैनिक सामना अग्रलेखात काय म्हटले? | Saamana On Politics
“पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा ही जोडगोळी आपणच विश्वाचे तारणहार असल्याच्या आविर्भावात वावरत असते. मात्र आता मोदी-शहांच्या कारभाराचे ढोंग उघडे पाडणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या पाच वर्षांत गुजरातमधून 40 हजार महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत. हा आरोप राजकीय विरोधकांनी केलेला नाही तर नॅशनल क्राइम ब्युरोने ही धक्कादायक माहिती समोर आणली आहे. या अहवालाने गुजरातमधील राज्यकारभाराचे धिंडवडेच काढले आहेत”, अशी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
विवेक अग्निहोत्रीसारख्यांनी ‘गुजरात फाइल्स’ची निर्मिती करायला हरकत नाही
“कश्मीर फाइल्स’, ‘द केरला स्टोरी’प्रमाणेच विवेक अग्निहोत्रीसारख्यांनी ‘गुजरात फाइल्स’ची निर्मिती करायला हरकत नाही, पण ‘द केरला स्टोरी’ आणि ‘कश्मीर फाइल्स’बाबत ‘हे सत्य आहे, दडपता येणार नाही’ असे प्रचारकी भाष्य मोदींसह समस्त भाजपाकडून करण्यात येत आहे. मग ते गुजरातमधील बेपत्ता 40 हजार मुलींवरील ‘स्टोरी’ला निदान पडद्यावर तरी पाठबळ देतील काय?” असा सवालही ठाकरे गटाने विचारला आहे.
दरम्यान, ठाकरे गटाने यावरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारलाही लक्ष्य केलं आहे. “महाराष्ट्रातून दररोज 70 मुली बेपत्ता होत आहेत. गेल्या फक्त तीन महिन्यांतील ही संख्या तब्बल साडेपाच हजारांपेक्षा जास्त आहे. मग राज्यातील मिंधे सरकार आणि त्याचे गृहखाते काय करीत आहे? राजकीय सूडापोटी विरोधकांच्या मागे लागण्यापेक्षा आपल्या नाकाखालून तीन महिन्यांत साडेपाच हजारांवर मुली बेपत्ता कशा झाल्या? त्यांचा शोध घेण्यासाठी मिंधे सरकारने तपास यंत्रणा कामाला लावाव्या”, अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
‘लव्ह जिहाद’ हा तर तणाव निर्माण करण्याचा त्यांचा हुकुमी एक्का
“बजरंगबली, हनुमान चालिसा या मुद्द्यांमध्ये भाजपा व त्यांची सरकारं अडकून पडली आहेत. ‘लव्ह जिहाद’ हा तर तणाव निर्माण करण्याचा त्यांचा हुकुमी एक्का आहे, पण गुजरातसह अनेक राज्यांतून हजारो महिला आणि मुली बेपत्ता होत आहेत यावर एकही भाजपा जिहादी बोलायला तयार नाही”, असंही ते म्हणाले.
“देश विज्ञान, आधुनिकतेच्या मार्गाने निघालाच होता व त्यास खीळ बसून पुन्हा एकदा आपण पुराण युगात निघालो हे चित्र विदारक आहे. बेपत्ता मुलींना शोधणं पोलिसांना जमत नसेल तर त्यांनी गुवाहाटीत रेडा बळीसारखे सध्याचे विधी घडवून लाखो बेपत्ता मुलींचा शोध घ्यावा. नाही तर गुजरातच्या साबरमती आश्रमात राणा दाम्पत्याला 21 दिवस अखंड हनुमान चालिसा पठण करण्याच्या कार्यक्रमाला बसवावे”, अशी बोचरी टीकाही ठाकरे गटाने केली आहे.