मुंबई,दि.12: शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दैनिक सामनाला मुलाखत दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला जोरदार रोखठोक मुलाखत देऊन अनेक विषयांवर परखड मते मांडली. उद्धव ठाकरे यांनी दिल्लीच्या मोगलाईवर शक्तिमान हल्ला केला. ‘‘दिल्लीतल्या दोन खेचरांना महाराष्ट्रातील पाण्यात फक्त पवार-ठाकरेच दिसत आहेत. आम्ही त्या खेचरांना कायमचे पाणी पाजू.’’ असे ते म्हणाले.
‘‘लोकशाही वाचविण्यासाठी हे महाभारत सुरू आहे. स्वातंत्र्य टिकवण्यासाठी हा लढा आहे,’’ असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मोदींना आतापर्यंत महाराष्ट्राचे प्रेम मिळाले. आता महाराष्ट्राचा शाप काय असतो ते अनुभवा, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत दोन भागांत प्रसिद्ध होत आहे.
उध्दव ठाकरे म्हणाले, आताची निवडणूक ही महाभारतासारखी चालली आहे. हे खरंच आहे. त्यावेळच्या महाभारतामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं. यावेळेला आपल्या देशातील लोकशाहीचं वस्त्रहरण होतंय. म्हणून ही लोकशाही वाचवण्यासाठीची लढाई आहे. स्वातंत्र्यलढा हा एक वेगळा भाग होता. त्या काळात आपण नव्हतो. ज्यांनी ज्यांनी संघर्ष केला, बलिदान दिलं, त्या सर्व क्रांतिवीरांनी आणि त्याग करणाऱया सगळय़ा स्वातंत्र्यसैनिकांनी अपार कष्ट करून, शौर्य गाजवून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिलं. हे स्वातंत्र्य टिकवण्याचं काम आपण केलंच पाहिजे.
सर्वोच्च न्यायालयात आपल्याला न्याय मिळणार याची मला खात्री आहे. कारण तसं घटनेमध्ये नमूदच आहे. परिशिष्ट दहा! सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल बाकी असताना पंतप्रधान आपल्या शिवसेनेला, म्हणजे माझ्या शिवसेनेला, जी शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केली, जिचं नाव माझ्या आजोबांनी ठेवलं, तिला ‘नकली शिवसेना’ म्हणतायत. याचा अर्थ उघड आहे… निवडणूक आयोग हा त्यांचा नोकर आहे. लवादानेसुद्धा ते म्हणतील तसंच काम केलेलं आहे. आता सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा आम्हाला हे चिन्ह किंवा नाव देऊ नये, असा अप्रत्यक्ष दबाव हे आपले प्रधानमंत्री सर्वोच्च न्यायालयावरती आणतायत की काय, असा प्रश्न पडलेला आहे. असे ठाकरे म्हणाले.