पैशांची वारेमाप उधळपट्टी करणारी आणि सत्तेचा माज दाखवून लढवली जाणारी निवडणूक

0

सोलापूर,दि.१५: महाराष्ट्रातील २९ महापालिकाकरिता आज मतदान होत आहे. मुंबई, सोलापूर, नागपूरसह अनेक शहरांमध्ये आज मतदान होत असून उद्या (दि.१६) लगेच मतमोजणी होणार आहे. मतमोजणी नंतर कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होईल. मात्र या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात दबावतंत्र, पैशाचा वापर करण्यात आला आहे असा आरोप शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसने केला आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर दैनिक सामनाने अग्रलेखात पैशांची वारेमाप उधळपट्टी करणारी आणि सत्तेचा माज दाखवून लढवली जाणारी निवडणूक आज होत आहे. महाराष्ट्राचे राज्य हे भ्रष्ट पैशांनी बरबटलेले राज्य झाले आहे, अशी टीका केली आहे. 

सामना अग्रलेख जसाच्या तसा 

मतदान हा अधिकार आहे, लोकशाहीने दिलेले अमोघ शस्त्र आहे. बा, मराठी माणसा, मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसावर चाल करून आलेल्या सत्तापक्षांच्या विरोधात आज तुला हेच अमोघ शस्त्र वापरायचे आहे. आजचे मतदान मराठीच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि ती जिंकावीच लागेल. मराठी माणसा, उचल ते मतदानाचे शस्त्र आणि उधळ तो भंडारा! शुक्रवारी मुंबईत मराठी माणसाच्या एकजुटीचाच मंगल कलश अवतरेल आणि संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील 106 हुतात्मे त्यावर पुष्पवृष्टी करतील याविषयी आमच्या मनात शंका नाही.

पैशांची वारेमाप उधळपट्टी करणारी आणि सत्तेचा माज दाखवून लढवली जाणारी निवडणूक आज होत आहे. महाराष्ट्राचे राज्य हे भ्रष्ट पैशांनी बरबटलेले राज्य झाले आहे व हा चिखल साफ करणारे नेतृत्व सत्ताधाऱ्यांत नाही हे मुंबईसह 29 महापालिकांच्या प्रचारात दिसले. त्या सर्व महापालिकांसाठी आज मतदान होईल. मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर या मुख्य महानगरपालिका यात आहेत, पण संपूर्ण देशाला प्रश्न पडला आहे, मुंबईत काय होणार? ही पहिलीच निवडणूक असावी की, ज्या निवडणुकीत आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उत्तरेचे मुख्यमंत्री योगी महाराजांचे चरण कमल मुंबईस लागले नाहीत. कारण मुंबईकरांच्या मनात काय आहे ते दिल्लीस समजले व बेअब्रू होऊ नये म्हणून या सगळ्यांनी मुंबईत येण्याचे टाळले. मुंबई-ठाण्याची लढाईही प्रामुख्याने मराठी माणसाच्या अस्तित्वाची आणि न्याय्य हक्कांची आहे. मुंबई संकटात आहे. त्यामुळे मराठी माणसाचे अस्तित्व संकटात आहे. त्यामुळे हा लढा मराठी माणसांच्या एकजुटीचा आहे. आम्हाला शाहीर अमरशेख यांच्या बुलंद पोवाड्यातील एक कडवे आठवते…

‘‘बा, महाराष्ट्रा!

इभ्रत तुझी ही इरेला पडली,

काढा नवका बाहेर

शिवरायांची मुंबई,

वादळात शिरली!

हे सत्य आहे. महाराष्ट्रद्रोह्यांच्या वादळाचे तडाखे मुंबईला बसत आहेत. मराठी माणसांची एकजूट मुंबईच काय, तर महाराष्ट्रात कोठेच टिकू नये यासाठी भाजप आणि त्यांची शहासेना सर्व हत्यारे वापरत आहेत. हे सर्व मुंबईसह महाराष्ट्राचे मराठीपण नष्ट करण्यासाठी सुरू आहे. म्हणूनच मुंबईसह राज्यातील प्रत्येक महानगरपालिकेची निवडणूक मराठी जनांच्या अस्तित्वाची लढाई आहे.

गेल्या महिन्यात राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतींसाठी मतदान पार पडले. त्यात सत्ताधाऱ्यांकडून जो पैशांचा आणि सत्तेच्या गैरवापराचा खेळ केला गेला तोच 29 महापालिकांच्या निवडणुकांसाठीही खेळला गेला. ‘बिनविरोध’ निवडीचा ‘घोटाळा’ महापालिका निवडणुकीतही 70 ठिकाणी करण्यात आला. प्रचाराच्या तोफा मंगळवारी संध्याकाळी थांबल्यानंतर मधल्या दोन दिवसांत सत्तापक्षांकडून ‘रात्रीस खेळ चाले’चे प्रयोग ठिकठिकाणी झाले. काही ठिकाणी वॉशिंग मशीन, काही ठिकाणी चांदीच्या वाट्यांचे वाटप, तर काही ठिकाणी प्रचार पत्रकांबरोबर पैशांच्या पाकिटांचे वाटप झाले. काही ठिकाणी वाटप रंगेहाथ पकडले गेले. त्यात निवडणूक आयोगही नेहमीप्रमाणे सत्ताधाऱ्यांच्या मदतीला धावला. प्रचाराची मुदत संपल्यावरही घरोघरी जाऊन प्रचार करण्याची परवानगी दिली गेली. आयोगानेच नियमांना बगल देण्याचा हा प्रकार भयंकर आणि गंभीर आहे.

(साभार: दैनिक सामना)

सूचना: दैनिक सामनात प्रसिद्ध झालेला अग्रलेख जसाच्या तसाच वापरण्यात आला असून सोलापूर वार्ताने मजकुरात काहीही बदल केलेला नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here