सोलापूर,दि.३१: भाजपची केंद्रात २०१४ पासून सत्ता आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. भाजप सत्तेत आल्यानंतर विरोधी पक्षांना संपवण्याचे काम करत आहे, असा आरोप केला जात आहे. महाराष्ट्रात ही भाजपची सत्ता आहे. मात्र भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडून विरोधकांची ताकत कमी करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप करण्यात येतोय. विरोधी पक्ष नेत्याला भाजप पक्ष आणि सरकार अजिबात किंमत देत नाही, असा आरोप दैनिक सामना अग्रलेखात करण्यात आला आहे.
दैनिक सामना अग्रलेख
विरोधी पक्षनेत्याचे महत्त्व नेहरू काळात जास्त दिसले. परदेशी पाहुणे, राष्ट्राराष्ट्रांचे अध्यक्ष, पंतप्रधान भारतात येत तेव्हा ते विरोधी पक्षनेत्यांची आवर्जून भेट घेत; पण मोदी व त्यांचा भाजप सत्तेवर आल्यापासून परदेशी पाहुण्यांना विरोधी पक्षनेत्यांना भेटू दिले जात नाही. जणू हा देश व लोकशाहीचे आपण एकमेव मालक आहोत, येथे विरोधी पक्ष अस्तित्वात नाही, असे भासवले जाते. प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रीय परेडमध्येही राहुल गांधी व मल्लिकार्जुन खरगे यांना मागच्या रांगेत बसवले गेले. महाराष्ट्रात विरोधी पक्षनेताच नाही. अर्थात, या सगळ्यात बेअब्रू झाली आहे ती मोदी, भाजप व त्यांच्या राष्ट्रीय चमचे मंडळाची. राजपथावर फडकलेला तिरंगाही या भूमिकेमुळे संतप्त झाला असेल.
महाराष्ट्रात व देशात गेल्या काही दिवसांत विचित्र आणि दुःखद घटना घडल्या. त्यामुळे अनेक विषय मागे पडले. दिल्लीत प्रजासत्ताक दिनाचा राष्ट्रीय सोहळा पार पडला. तो सोहळा राष्ट्रीय न राहता भाजपने त्यातही राजकारण केले. खासकरून विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या बाबतीत. देशाच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना तिसऱ्या रांगेत बसवले. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनासुद्धा गांधींच्या सोबतीने तिसऱ्याच रांगेत बसवून सरकारने आपल्या क्षुद्र मनोवृत्तीचे दर्शन घडवले आहे. भारताच्या संसदीय परंपरेचे हे वैशिष्ट्य आहे की, वैचारिक, राजकीय मतभेदांच्या पलीकडे व्यक्तिगत सन्मान आणि शिष्टाचारास प्राधान्य दिले जाते; पण हा शिष्टाचार आणि मर्यादेचे अलीकडे पालन केले जात नाही.
मोदी व त्यांच्या लोकांच्या मनात गांधी परिवाराविषयी द्वेषभावना आहे. त्या द्वेषाचे प्रदर्शन ते जाहीरपणे करतात; पण स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनाचे राष्ट्रीय सोहळे तरी अशा द्वेषभावनेपासून दूर ठेवावेत. एक तर स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताकाच्या भारतीय लढ्याशी मोदी, शहा वगैरे लोक, त्यांचे राजकीय पूर्वज, भाजपचा काडीमात्र संबंध नाही. उलट मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात संघर्ष व त्याग केला, तुरुंगवास भोगले. त्यामुळे राहुल गांधी यांचा त्या नात्याने या दोन्ही राष्ट्रीय सोहळ्यांशी निकटचा संबंध येतो. त्यात ते कॅबिनेट दर्जा असलेले विरोधी पक्षनेते आहेत. पुन्हा गांधी हे मोदी सरकारच्या मेहेरबानीवर झालेले विरोधी पक्षनेते नाहीत. लोकसभेत 240 खासदार विरोधी पक्षाचे आहेत व त्यात 100 खासदार काँगेस पक्षाचे आहेत.
मोदी यांच्या हातात होते तेव्हा 2019 साली त्यांनी लोकसभेत विरोधी पक्षनेता होऊ दिला नाही. त्यांना विरोधी पक्षनेत्याचे असे भय वाटणे साहजिक आहे. गांधी लोकसभेत व बाहेर मोदी सरकारच्या भ्रष्टाचाराची, गौतम अदानीप्रेमाची, राष्ट्रवादाच्या ढोंगांची लक्तरे काढतात. गांधींसमोर पंतप्रधान निरुत्तर होतात. त्यामुळे अशा राष्ट्रीय सोहळ्यात मोदी विरोधी पक्षनेत्यांचा अपमान करतात. गांधी यांना मल्लिकार्जुन खरगेंसह तिसऱ्या रांगेत बसवले व हे ‘प्रोटोकॉल’ म्हणजे राजकीय शिष्टाचारानुसारच घडले, असे भाजपचे प्रवत्ते माध्यमांवर सांगत आहेत. राष्ट्रीय सोहळ्यात बसण्याची व्यवस्था राष्ट्रपती सचिवालयाकडून जारी केली जाते. आता भाजपवाले सांगतात त्या प्रोटोकॉल क्रमानुसार विरोधी पक्षनेत्याचे स्थान सातवे आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, माजी राष्ट्रपती, उपपंतप्रधान, भारताचे मुख्य न्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि माजी पंतप्रधानांचा क्रम लागतो. यात तथ्य नाही. जेथे राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींच्या नेमणुकाच पंतप्रधान करू लागले तेथे कोणत्या प्रोटोकॉलचे दाखले भाजपचे लोक देत आहेत? 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडची छायाचित्रे प्रसिद्ध झाली.
त्यात ‘कॅबिनेट’ मंत्री आपल्या कुटुंबकबिल्यासह पहिल्या रांगेत बसलेले दिसत आहेत. विरोधी पक्षनेते म्हणून तोच कॅबिनेट दर्जा गांधी व खरगे यांनासुद्धा आहे, पण त्यांना तिसऱ्या रांगेत फेकले. परदेशी पाहुणा व पंतप्रधान, राष्ट्रपतींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था असते व पहिल्या रांगेत 35 आसने असतात. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांना सहज पहिल्या रांगेत सामावून घेता आले असते; पण मोदी-शहांच्या लोकशाही व्याख्येत विरोधी पक्षनेत्यांना स्थान नाही. देशात विरोधी पक्ष ठेवायचाच नाही हे त्यांचे धोरण दिसते. विरोधी पक्ष फोडून त्यांनी त्यांना भाजपच्या गर्भात सामावून घेतले. विरोधी पक्ष फोडण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग, राज्यपालांना बेकायदेशीररीत्या वापरले. हे सगळे ‘वापरून’ झालेले लोक प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रीय सोहळ्यात ‘प्रोटोकॉल’ म्हणून विरोधी पक्षनेत्यांच्या पुढच्या रांगेत बसतात, हा कहरच झाला.
प्रजासत्ताकाचा हा अपमान आहे. सर्व भ्रष्ट विरोधक मोदी-शहांनी भाजपात घेतले व स्वच्छ प्रतिमेचे राहुल गांधी यांना प्रजासत्ताक दिनी अपमानित केले. अर्थात गांधी यांचे व्यक्तिमत्त्व झुंजार व मान-अपमानापलीकडचे आहे. कोणत्या रांगेत बसवले याची पर्वा न करता ते अशा सोहळ्याचा आनंद लुटत असतात. पण येथे उघडा पडला तो भाजप. संसदीय लोकशाहीत विरोधी पक्षाला जे स्थान असते ते महत्त्वाचे आहे. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका अशा देशांतील संसदीय लोकशाहीत पंतप्रधानांइतकेच विरोधी पक्षाच्या नेत्याचे स्थान महत्त्वाचे मानले जाते. संसदीय लोकशाहीचा तो अविभाज्य व आवश्यक भाग आहे. अनेकदा त्याचे वर्णन पर्यायी पंतप्रधान असे केले जाते. ब्रिटीश आमदानीत लॉर्ड कर्झन यांनी नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचा उल्लेख ‘अनधिकृत विरोधी पक्षाचे नेते’ म्हणून केला होता. विरोधी पक्षनेत्याचे महत्त्व नेहरू काळात जास्त दिसले. विरोधी पक्षनेत्याला संसदेच्या सभागृहात पहिल्या रांगेत स्थान दिले जाते. संसद भवनात त्याला स्वतंत्र कक्ष व सेवकवर्ग दिला जातो. प्रमुख विषयावर सरकारवर हल्ला करण्याचा पहिला हक्क त्याचा आहे, हे तत्त्वतः मान्य झाले आहे.
सरकारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यामधील मतभेदाचे मुद्दे मिटवून सभागृह सुरळीत चालवण्यासाठी ज्या अनौपचारिक बैठका होतात त्यात सिंहाचा वाटा विरोधी पक्षनेत्याचा असतो. परदेशी पाहुणे, राष्ट्राराष्ट्रांचे अध्यक्ष, पंतप्रधान भारतात येत तेव्हा ते विरोधी पक्षनेत्यांची आवर्जून भेट घेत; पण मोदी व त्यांचा भाजप सत्तेवर आल्यापासून परदेशी पाहुण्यांना विरोधी पक्षनेत्यांना भेटू दिले जात नाही. जणू हा देश व लोकशाहीचे आपण एकमेव मालक आहोत, येथे विरोधी पक्ष अस्तित्वात नाही, असे भासवले जाते. महाराष्ट्रासारख्या राज्यातही दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेता नाही. सरकार पक्षाचा संसदीय लोकशाहीवरचा हा माजोरडेपणा आहे. आता तर महाराष्ट्राच्या दोन्ही विधिमंडळ सभागृहांत भविष्यात विरोधी पक्षनेताच राहू नये यासाठी नव्या कायद्याची तरतूद सुरू केली आहे. भाजप आमदार, खासदारांच्या संख्येचा ‘आकडा’ काढून विरोधी पक्षनेते पद द्यायचे की नाही ते कायद्याने ठरवणार आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रीय परेडमध्येही राहुल गांधी व मल्लिकार्जुन खरगे यांना मागच्या रांगेत बसवले गेले. महाराष्ट्रात विरोधी पक्षनेताच नाही. अर्थात, या सगळ्यात बेअब्रू झाली आहे ती मोदी, भाजप व त्यांच्या राष्ट्रीय चमचे मंडळाची. राजपथावर फडकलेला तिरंगाही या भूमिकेमुळे संतप्त झाला असेल.








