Russia Ukraine: रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिला गंभीर इशारा

0

दि.15: Russia Ukraine: रशिया युक्रेन युद्धाच्या (Russia Ukraine War) पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) गंभीर इशारा दिला आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची झळ संपूर्ण जगाला पोहोचत असतानाच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी गंभीर इशारा दिला आहे. नाटोच्या फौजांची रशियाच्या लष्कराशी चकमक झाल्यास जगभरात विध्वंस होईल, असे पुतीन यांनी म्हटले आहे. कझाकिस्तानची राजधानी अस्तानामध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेतील पुतीन यांच्या या वक्तव्यानंतर जगाच्या चिंतेत भर पडली आहे.

“कोणत्याही परिस्थितीत रशियन सैन्याशी नाटोच्या सैनिकांचा थेट संपर्क अथवा संघर्ष झाल्यास जगावर मोठी आपत्ती ओढवू शकते. जे लोक ही भाषा करत आहेत, ते हे पाऊल न उचलण्याइतके हुशार आहेत, अशी मला आशा आहे”, असे पुतीन यांनी म्हटले आहे. रशियाने युक्रेनचे चार प्रदेश ताब्यात घेतल्यानंतर रशियन भूभागाच्या संरक्षणासाठी अण्वस्रांचा वापर करण्याचा इशारा गेल्या महिन्यात पुतीन यांनी दिला होता. पुतीन यांच्या या भूमिकेचा संयुक्त राष्ट्राने निषेध नोंदवला होता.

“रशियाच्या बेजबाबदार भूमिकेमुळे जगातील शांतता आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे. रशियाने युक्रेनवर अण्वस्रांचा वापर केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील”, असे जी-7 देशांनी एका निवेदनात म्हटले आहे. जी-7 देशांमध्ये इंग्लंड, जर्मनी, इटली, कॅनडा, अमेरिका, फ्रान्स आणि जपानचा समावेश आहे. जगात शीतयुद्धानंतर प्रथमच अणुयुद्धाचा धोका निर्माण झाला असून पुतीन यांचे अण्वस्रांबाबतचे वक्तव्य मस्करीत घेऊ नये, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटले आहे. 1962 मध्ये झालेल्या क्युबियन क्षेपणास्रांच्या हल्ल्यानंतर पहिल्यांदाच महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचे बायडन म्हणाले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here