russia ukraine war: रशियाला वेढा घालण्यासाठी अमेरिकेने 12000 सैनिक पाठवले, तर तिसरे महायुद्ध सुरू होईल: जो बायडन

0

दि.12: russia ukraine war: युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियावर (Russia Ukraine War) अमेरिकेसह अनेक पाश्चात्य देशांची नजर आहे. आता परिस्थिती अशी आहे की अमेरिकेने (America) रशियाला वेढा घालण्यासाठी 12,000 सैनिक पाठवले आहेत. त्याच वेळी, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) म्हणाले की, आम्ही नाटोच्या प्रत्येक क्षेत्राच्या प्रत्येक इंचाचे संरक्षण करू. त्याचवेळी युक्रेनमध्ये तिसरे महायुद्ध न लढण्याचा आग्रहही त्यांनी केला.

रशिया-युक्रेन युद्धाचा आज 17 वा दिवस आहे. असे मानले जात होते की राजधानी कीववरील रशियन पकड ढिली होत आहे. पण मध्यरात्री झालेल्या बॉम्बस्फोटांनी पुन्हा कीव हादरले आहे. त्याच वेळी, अमेरिकेकडून रशियावर निर्बंध लादण्याचा काम सुरू आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशिया-युक्रेन संघर्षावर बोलताना पुन्हा एकदा रशियाला इशारा दिला आहे. रशियाने रासायनिक शस्त्रांचा वापर केल्यास त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील. अमेरिका युक्रेनमध्ये जाऊन रशियाशी लढणार नाही. मात्र, नाटो आणि क्रेमलिन यांच्यात थेट लढाई झाली, तर तिसरे महायुद्ध गतिमान होईल, असा दावा करत रशिया कधीही युक्रेन जिंकू शकत नाही, असे बायडन यांनी म्हटले आहे. 

तिसरे महायुद्ध होऊ नये

युरोपातील सहकारी देशांसोबत आम्ही ठामपणे उभे राहू. नाटो देशाच्या एक एक इंच जमिनीच्या रक्षणासाठी आम्ही पुढाकार घेऊ. तसेच अन्य देशांना त्यासाठी प्रेरित करू. नाटो देशांची रशियाशी लढाई झाल्यास तिसरे महायुद्ध अटळ होईल. मात्र, तिसरे महायुद्ध होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे बायडन यांनी स्पष्ट केले. उत्तर अटलांटिक संधी संघटन म्हणजेच नाटो हा 30 उत्तर अमेरिका आणि युरोपीय देशांचा एक समूह आहे. याचा उद्देश राजकीय आणि सैन्य साधनांच्या माध्यमातून आपल्या सदस्य देशांचे स्वातंत्र्य आणि संरक्षणाची हमी देणे असा असल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, एकीकडे रशियाने युक्रेनवर हल्ले सुरू केल्यानंतर जगातील विविध देशांनी निर्बंध लादण्यास सुरुवात केली. आर्थिक निर्बंधांसह अनेक गोष्टींवर बंदी आणण्यात आली. अनेक बड्या कंपन्यांनी आपली उत्पादन रशियात विक्री करणार नसल्याचे सांगितले आहे. एकूणच या कृतीमुळे रशियाची कोंडी करण्याचा प्रयत्न अन्य देशांकडून सुरू करण्यात आला आहे. दुसरीकडे, जागतिक बँकेने युक्रेनसाठी 72 कोटी 30 लाख डॉलर्सचे कर्ज आणि अनुदानाचे पॅकेज मंजूर केले आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here