Russia Ukraine War: रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचं स्फोटक विधान

0

दि.२७: Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध (Russia Ukraine War) शिगेला पोहोचले आहे. रशियाने युक्रेनचे मोठे नुकसान केले आहे. रशियावर अमेरिका आणि त्याच्या मित्रराष्ट्रांनी अनेक कठोर निर्बंध लादले असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी आता थेट इशारा दिला आहे. बायडन (Joe Biden) यांनी तिसऱ्या जागतिक युद्धाबाबत सर्वात मोठे विधान केले आहे.

भारतानेही संवाद हाच वाद मिटविण्याचा मार्ग आहे असे म्हटले होते. रशिया आणि युक्रेन यांनी संवाद साधावा असे आवाहन भारताने केले होते. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आणखीच चिघळत चालले आहे. युक्रेनची राजधानी कीव्ह शहर चारही बाजूंनी वेढले गेले आहे. यात युक्रेन एकाकी पडला असताना व प्राणपणाने रशियन फौजांशी लढत असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी टोकाचे विधान करत रशियाला कठोर संदेश दिला आहे. ‘युक्रेनवर हल्ला केल्यानंतर रशियावर निर्बंध लावण्याचे पाऊल आम्ही उचलले आहे. याला पर्याय आता एकच असू शकतो आणि तो म्हणजे तिसऱ्या जागतिक युद्धाची सुरुवात’, असे विधान करून बायडन यांनी जगाची चिंता वाढवली आहे.

बायडन (Joe Biden) यांनी एका मुलाखतीत युक्रेनमधील भीषण स्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. रशियाला रोखण्यासाठी आता मोजकेच पर्याय उरले आहेत, असे सांगत बायडन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. जो देश आंतरराष्ट्रीय कायदे मानत नाही. त्याचे उल्लंघन करतो. त्याला त्याची किंमत मोजावीच लागेल आणि त्यादिशेने पावले उचलावी लागतील. आर्थिक व अन्य आघाड्यांवर आजवरचे सर्वात व्यापक असे निर्बंध रशियावर लादले गेले आहेत. यापुढे जाऊन रशियासोबत थेट युद्ध लढावे आणि तिसऱ्या जागतिक युद्धाची सुरुवात करावी, हा एकमेव पर्याय उरतो, असे बायडन म्हणाले. असे कोणतेही पाऊल लगेच उचलले जाणार नसल्याचेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.

व्लादिमीर पुतीन यांच्यावर वैयक्तिक निर्बंध

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि परराष्ट्रमंत्री सेरगे लाव्हरोव्ह यांना रशियाच्या युक्रेनमधील हल्ल्यासाठी थेट जबाबदार धरून अमेरिकेने त्यांच्यावर वैयक्तिक निर्बंध लागू केले आहेत. अमेरिका आणि मित्रराष्ट्रांनी या आठवड्याच्या सुरुवातीला रशियाच्या आर्थिक यंत्रणेच्या मुख्य पायाभूत सुविधांना लक्ष्य केले होते. यामध्ये मॉस्कोच्या मोठ्या आर्थिक संस्थांवरील निर्बंधांचाही समावेश आहे. हे नवे निर्बंध या व्यापक कृतीसंबंधित आहेत, असे अमेरिकेच्या अर्थ विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. पुतीन, लाव्हरोव्ह आणि रशियाच्या सुरक्षा परिषदेच्या सदस्यांवर निर्बंध लागू करून अमेरिका मित्रराष्ट्र आणि भागीदारांच्या सहयोगाने रशियाच्या युक्रेनमधील हल्ल्याला जोरकस प्रत्युत्तर देत आहेत.

पुतीन आणि लाव्हरोव्ह हे या आक्रमणासाठी थेट जबाबदार आहेत. अर्थ विभागाने कोणत्याही देशाच्या प्रमुखावर निर्बंध लादणे, ही खूप दुर्मीळ बाब आहे. अध्यक्ष पुतीन एका खूपच लहान गटात सहभागी झाले आहेत. यामध्ये उत्तर कोरियाचे किम जोंग उन, बेलारूसचे अध्यक्ष अलेक्सांद्र लुकाशेंका, सीरियाचे अध्यक्ष बशल अल असद यांचा समावेश आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अमेरिकेने रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोइगु, रशियाच्या सैन्य दलाचे चीफ ऑफ जनरल स्टाफ व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांच्याविरोधातही निर्बंध लागू केले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here