जयपूर,दि.९: राजस्थानच्या जयपूरहून दिल्लीला जाणाऱ्या स्लीपर बसला आग लागण्याची घटना समोर आली आहे. या आगीत बसमधील दोन प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर १० ते १२ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जयपूरहून दिल्लीला जात असताना गुरुग्रामच्या सिग्नेचर फ्लायओव्हरवर ही घटना घडली आहे. आगीमुळे भाजलेल्या प्रवाशांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर बस पूर्णपणे जळून गेली आहे. दरम्यान, पोलीस या घटनेचा तपास करत असून आग लागण्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण, बसला आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप कुठलीही माहिती मिळालेली नाही.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार जयपूरहून दिल्लीला जाणारी स्लीपर बस (AR 01 K 7707) बुधवारी मध्यरात्री गुरग्रामच्या सिग्नेचर टॉवर फ्लायओव्हरवर पोहोचली तेव्हा या बसने पेट घेण्यास सुरुवात केली. बसमधील प्रवाशांनी आरडा-ओरड सुरू केली. बस प्रवाशांनी भरली होती. पेटती बस पाहून त्या रस्त्याने जाणाऱ्या इतर लोकांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर काही वेळात अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. बसला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला खूप मेहनत घ्यावी लागली. कारण संपूर्ण बस जळत होती.
या आगीत होरपळून दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर १० ते १२ प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त वरुण दहिया म्हणाले, बुधवारी रात्री ही घटना घडली. घटनास्थळावरून होरपळून मृत्यू झालेल्या दोन प्रवाशांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. आगीमुळे भाजलेल्या प्रवाशांना जवळच्याच वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. आम्ही याप्रकरणी तपास करत आहोत. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.