राष्ट्रीय समाज पक्षाच्या माजी शहर अध्यक्षाची निर्दोष मुक्तता

0

सोलापूर,दि.२७: पोलिसांना गुंगारा देऊन पळून जाताना हल्ला केल्याप्रकरणात न्यायालयाने राष्ट्रीय समाज पक्ष (Rashtriya Samaj Paksha) सोलापूरच्या माजी शहराध्याक्षाची निर्दोष मुक्तता केली आहे. यातील संशयित आरोपी विशाल मारुती नाईकवाडे, चंद्रकांत कानडे रा. सोलापूर यांची पोलिसांना गुंगारा देऊन पळून जाताना हल्ला केल्याप्रकरणी प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांनी निर्दोष मुक्तता केली.

यात हकीकत अशी की, फिर्यादी यांना १०/०२/२०२० रोजी सकाळी ७ च्या सुमारास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कल्याण नगर भाग २ मध्ये इसम नामे विशाल नाईकवाडे हा घरगुती गॅस टाकीमधील गॅस इंधन म्हणून रिक्षामध्ये भरत आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने फिर्यादी यांनी सदर बातमीचा आशय त्यांच्या वरिष्ठांना कळवला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी गुडमोर्निंग ड्युटीस असलेले पोलीस व २ पंचना घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. 

त्याप्रमाणे फिर्यादी व इतर पोलीस तसेच २ पंच यांनी त्यांची गाडी कल्याण नगर येथील रोडवर उभी करून बातमीच्या ठिकाणी गेले. तेथे रिक्षा उभी होती व चालक रिक्षामध्ये ड्राईवर सीट वर बसला होता व बातमीतला इसम विशाल नाईकवाडे हा सदर रिक्षामध्ये घरगुती गॅस भरत असताना फिर्यादी यांनी त्यास पकडले व त्यास रिक्षामध्ये इतर सामानासह बसण्याची विनंती केली तेव्हा त्याने मी कोण आहे ओळखत नाही का? मी तुम्हाला बघून घेतो असे म्हणून सदर ठिकाणी पडलेल्या विटने डोकीत मारून घेऊन मोठमोठ्याने आरडा ओरडा करून तुमच्याविरुद्ध तक्रार करतो असे म्हणून फिर्यादीशी धक्काबुक्की करून शिवीगाळ करून ढकलून फिर्यादी करत असलेल्या सरकारी कामात अडथळ निर्माण करून गर्दीमधून सामानासह रिक्षा व चालकासह पळून गेला. 

त्याप्रमाणे भा.द.वि. कलम ३५३, २८५, २८६, ३४ प्रमाणे विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. सदर कामी पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सदर खटल्याच्या सुनावणीवेळी सरकार पक्षातर्फे एकूण ४ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी महत्वाचे साक्षीदार म्हणजे फिर्यादी व सदर केसचे तपासाधिकारी हे होते. 

सदर खटल्यात आरोपीच्या वकिलांनी घेतलेली फिर्यादीची उलटतपासणी सदर खटल्यास कलाटणी देणारी ठरली. सदर फिर्यादीने उलटतपासणीमध्ये अनेक महत्वाच्या बाबी मान्य केल्या. सदर आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद करतेवेळेस अनेक महत्वाचे मुद्दे मांडले ते अश्याप्रकारे कि आरोपी हा पळून जाताना फिर्यादी यांनी त्याचा पाठलाग केला नाही किवा त्यांच्या पुढे हजार असलेल्या पोलीस पथकाला कळवले नाही व आरोपी हा घटनास्थळावरून पळून गेला हि बाब पोलीस स्टेशनला कळवली नाही. 

तसेच ज्या विटेने आरोपीने स्वतःच्या डोक्यात मारून घेतले ती वीट सुद्धा पोलिसांनी जप्त केली नाही. तसेच सदर आरोपी हा रासपचा शहर अध्यक्ष असल्यामुळे त्याच्या विरोधकांच्या सांगण्यानुसार हि खोटी केस केली आहे. 

सदर बाबींचा विचार करून यातील संशयित आरोपी विशाल मारुती नाईकवाडे, चंद्रकांत कानडे रा. सोलापूर यांची प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांनी निर्दोष मुक्तता केली.

यात आरोपींतर्फे अॅड. अभिजित इटकर, अॅड. सुमित लवटे, अॅड. फैयाज शेख, अॅड. अभिजित पाटील यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here