सोलापूर,दि.१३: RokhThok On Raj And Uddhav Thackeray शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जुलै रोजी एकत्र येऊन मराठी विजय दिवस साजरा केला. राज आणि उध्दव हे दोन बंधू हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आले. शाळेत पहिलीपासून हिंदी शिकवण्यास विरोध करत त्यांनी मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषा पहिलीपासून शाळेत शिकवली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे-पाटील यांचे मराठा आंदोलन पद्धतशीर संपवले व छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेऊन ओबीसींनाही थंड केले. याच काव्याने हे महाशय मराठी एकजुटीलाही खिंडार पाडतील असे त्यांचेच लोक उघडपणे बोलू लागले आहेत. असे दैनिक सामना रोखठोक सदरात संजय राऊत यांनी लिहिले आहे. रोखठोक सदरात राऊत यांनी राज-उध्दव ठाकरे बंधू एकत्र येऊ नये म्हणून विरोधक त्यातही फडणवीस कसे राजकारण करतील याबाबत भाष्य केले आहे.

दैनिक सामना रोखठोक सदर जसेच्या तसे | RokhThok On Raj And Uddhav Thackeray
महाराष्ट्रात सध्या मराठी एकजुटीचे जोरदार वारे वाहत आहेत. मराठीच्या प्रश्नावर दोन ठाकरे एकत्र आले, ते राजकीयदृष्ट्याही यावेत हा मराठी माणसांचा रेटा अभूतपूर्व आहे. मुंबई, महाराष्ट्र, मराठी माणसाविषयी व्यापारी भाजपला प्रेम नाही. मराठी माणसांशी लढण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांतल्या गुंड टोळ्यांना भाजपमध्ये समाविष्ट केले, हे चित्र काय सांगते?
दोन ठाकरे एकत्र आल्यामुळे मराठी माणसाचे सर्व प्रश्न लगेच मार्गी लागले असे होत नाही
महाराष्ट्रात सध्या मराठी एकजुटीचे जोरदार वारे वाहत आहेत. उद्धव आणि राज ठाकरे 5 जुलै रोजी मराठी विजय सोहळ्यांत एकत्र आले. त्यानंतर लोकांनी ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा केला. मराठीवरील अन्याय सहन करणार नाही व त्यासाठी एकजुटीने लढण्याचा आत्मविश्वास मराठी लोकांत निर्माण झाला. दोन ठाकरे एकत्र आल्यामुळे हा आत्मविश्वास निर्माण झाला हे खरे, पण त्यामुळे महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे सर्व प्रश्न लगेच मार्गी लागले असे होत नाही. मराठी माणूस व त्याचे सर्व प्रश्न जेथच्या तेथेच आहेत. हिंदी सक्तीविरोधात दोन ठाकरे एकत्र आले, पण त्यांची राजकीय युती अद्याप जाहीर झाली नाही. ती युती होणे गरजेचे आहे. तरच महाराष्ट्राला नवी दिशा मिळेल.
महाराष्ट्रात ज्या पद्धतीने मराठी एकजुटीचे वादळ निर्माण झाले ते पाहून दिल्ली आणि महाराष्ट्राचे सध्याचे सत्ताधारी हादरले आहेत. ही युती घडू नये यासाठी ते प्रयत्न करतील. मराठी एकजुटीच्या विजय मेळाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला विजेचे जोरदार धक्के बसले आहेत. त्याचे रूपांतर भूकंपाच्या जोरदार धक्क्यात होईल व आपले राज्य पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडेल याची सगळ्यांत जास्त भीती एकनाथ शिंदे व त्यांच्या बरोबरच्या लोकांना वाटते. ते बरोबर आहे. एकनाथ शिंदे हे चिंताग्रस्त होऊन लगेच दिल्लीत गेले. त्यांचे गुरू अमित शहांना भेटले.
“महाराष्ट्रात सध्या जे घडते आहे ते थांबवा. फडणवीस यांना हे वादळ रोखता येणार नाही.” यावर अमित शहा यांनी विचारले, “काय करायचे?” त्यावर शिंदे म्हणाले, “मी माझ्या लोकांसह भाजपमध्ये येतो. मला मुख्यमंत्री करा. हे सर्व रोखण्याची गारंटी देतो.” शहा – शिंदे यांच्यात ही चर्चा झाली व अशी चर्चा झाल्याची चर्चा शिंदे गटात सुरू आहे. शिंदे गटाचे उदय सामंत, शिरसाट अशा प्रकारचे मंत्री विधानसभेत उघडपणे बोलत होते की, “शहा व शिंदे मिळून मराठी माणसांची एकजूट फोडतील. राज व उद्धव यांना एकत्र येऊ देणार नाहीत.” शिंदे यांचे मंत्री ही विधाने कशाच्या बळावर करतात? ठाकरे आपल्या दबावाखाली येतील या कल्पनेत कोणी असतील तर ते मूर्ख आहेत. कोणताही दबाव आता मराठी माणूस स्वीकारणार नाही. वरळीनंतर मीरा – भाईंदर येथे ज्या पद्धतीने मराठी एकजूट उसळली ही खदखद सर्वच पातळीवर आहे. मुस्लिम समाजाबद्दल एकेकाळी नव्हता त्यापेक्षा जास्त रोष मुंबई – महाराष्ट्रात गुजराती, जैन समाजाबद्दल उफाळून येत आहे. तो अमित शहांच्या महाराष्ट्रद्वेष्टय़ा राजकारणामुळे. हा संतापाचा लाव्हा आता महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हय़ात, शहरात बाहेर पडेल असेच चित्र आहे.
वेगळ्यां भूमिका
वरळीच्या विजयी मेळाव्यानंतर भाजप व शिंदे गटाच्या प्रवक्त्यांच्या भूमिका मनोरंजक आहेत. राज ठाकरे यांची भूमिका मराठीबाबत एकदम योग्य, पण उद्धव ठाकरे यांच्या त्याच भूमिकेवर दोघांनी टीका केली. ती टीका सुरूच आहे. राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यातून निर्माण झालेली ही पोटदुखी सरळ दिसते. एक कार्यक्रम, एक मंच. दोन भाऊ एकत्र आले, त्यात एक बरा व दुसरा चुकीचा असे बोलणारे स्वतःच्याच अब्रूचे धिंडवडे त्या दिवशी काढत होते. मीरा-भाईंदर येथे व्यापाऱ्यांच्या मुजोरीविरुद्ध मराठी लोकांनी प्रचंड मोर्चा काढला. त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी गेलेले मंत्री प्रताप सरनाईक यांना लोकांनी पळवून लावले. या मोर्चाच्या गर्दीत व आयोजनात शिवसेना होती, पण मुख्यमंत्री फडणवीस ‘मनसे’चे नाव घेत राहिले व शिवसेनेचे नाव घेण्याचे टाळले. त्यामागचा कावा अनाजीपंतांचा आहे व तो दोन्ही ठाकऱ्यांनी समजून घेतला पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या व्यक्तीचे मन साफ नाही, हेच त्यातून दिसले. आपण राज्याचे मुख्यमंत्री झालो म्हणजे या राज्यातील लोकांना सर्व तऱ्हेची अक्कल शिकविण्याची परवानगी आपल्यालाच मिळाली अशा थाटात ते रोज बोलत असतात. पुन्हा त्यांचे बोलणे वकिली पद्धतीचे असते. हे वकील कसे? न्यायमूर्ती खिशात व दबावाखाली असल्यामुळेच यांची वकिली (फिक्सिंग) सध्या चालली आहे.