Rohit Pawar On Dilip Walse Patil: रोहित पवार यांचे दिलीप वळसे पाटील यांना प्रत्युत्तर

0

मुंबई,दि.२१: Rohit Pawar On Dilip Walse Patil: रोहित पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आजपर्यंतची सर्वात मोठी फूट पडल्यानंतर अजित पवार आपला गट घेऊन सरकारमध्ये सामील झाले. २ जुलै रोजी ते मविआतून बाहेर पडले आणि ५ जुलै रोजी झालेल्या जाहीर सभेतून अजित पवारांसह त्यांच्या गटाच्या विविध नेत्यांनी थेट शरद पवारांना लक्ष्य केलं. तेव्हापासून शरद पवार गट व अजित पवार गट यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. आता त्यात एका नव्या दाव्याची भर पडली असून कधीकाळी शरद पवारांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे दिलीप वळसे पाटील यांनीच शरद पवारांच्या राजकीय कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यावर पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांनी पाटलांना प्रत्युत्तर दिलं आहे.

दिलीप वळसे पाटील काय म्हणाले होते?

दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी एका कार्यक्रमात बोलताना शरद पवारांवर टीका केली. “शरद पवारांसारख्या उंचीचा नेता देशात नाही असं आपण म्हणतो. पण दुसऱ्या बाजूला शरद पवारांच्या एकट्याच्या ताकदीवर महाराष्ट्रातल्या जनतेने एकदाही शरद पवारांना बहुमत दिलं नाही, त्यांना मुख्यमंत्री केलं नाही. ममता बॅनर्जी होतात, मायावती होतात. अनेक राज्यांमधले प्रादेशिक पक्ष पुढे जात आहेत. पण आपले उत्तुंग नेते असताना आम्ही काही ठराविक आकड्यांपुढे जाऊ शकत नाही. आमचे जास्तीत जास्त ६०-७० आमदार निवडून येतात. कुणाशीतरी आघाडी करावी लागते”, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.

“आपण अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहोत. चिन्ह कुणाला मिळेल, नाव कुणाला मिळेल याचा निर्णय निवडणूक आयोगात होईल. त्याचा निर्णय आल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ होऊ शकते. हा निर्णय मतदार करत असतो. आपला वैयक्तिक निर्णय त्यात कुणाचाही नसतो. आता पुढे काय होईल, ते जसजशा घटना घडतील, तसतसं स्पष्ट होत जाईल”, असं सूचक विधानही वळसे पाटील यांनी केलं.

रोहित पवार यांचे दिलीप वळसे पाटील यांना प्रत्युत्तर | Rohit Pawar On Dilip Walse Patil

दरम्यान, शरद पवारांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या व्यक्तीकडून असं विधान आल्यानंतर रोहित पवारांनी दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. “मला आश्चर्य वाटतंय. लोक कदाचित असं म्हणतील की शरद पवारांच्या आसपास जे लोक आहेत त्यांनी ज्या पद्धतीने जबाबदारी पार पाडायला हवी होती, ती त्यांनी पार पाडली नसावी, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्णपणे बहुमत मिळालं नाही”, असं रोहित पवार म्हणाले.

“शरद पवारांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला, ज्यांना ताकद दिली, तेच जर आज या काळात, या वयात त्यांच्याबरोबर नसतील, जो विचार त्यांनी ३५-४० वर्षं स्वत: जपला, त्या विचाराला सोडून जर ते पलीकडे गेले असतील, तर आज त्याबाबतीत त्यांना बोलायचा किती हक्क आहे हे बघावं लागेल”, अशा शब्दांत रोहित पवार यांनी दिलीप वळसे पाटलांना लक्ष्य केलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here