Rohit Pawar On Devendra Fadnavis ‘देवेंद्र फडणवीस यांचं विधान आमच्यासाठी नव्हतं, तर…’ आमदार रोहित पवार

0

मुंबई,दि.६: Rohit Pawar On Devendra Fadnavis: राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देवेंद्र फडणवीस यांचं विधान आमच्यासाठी नव्हतं, तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी होतं असे म्हटले आहे. जेव्हा मी सांगतो की मी पुन्हा येईन, तेव्हा मी नक्की येतो आणि मी कसा येतो, हे सर्वांनाच माहिती आहे, असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातील एका कार्यक्रमात बोलताना केले होते. त्यांच्या या विधानावर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी या विधानावरून फडणवीसांवर खोचक शब्दात टीका केली आहे.

रोहित पवार काय म्हणाले? Rohit Pawar On Devendra Fadnavis

“देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’ या विधानाची आम्हाला कोणतीही भीती नाही. याची भीती खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाटायला हवी. देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन म्हणतात, पण ते कोणत्या पदावर येतील, याचं उत्तर एकनाथ शिंदे यांनी द्यावं, अशी खोचक टीका रोहित पवार यांनी केली. मुळात त्यांचं हे विधान आमच्यासाठी नव्हतं, तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी होतं”, असा टोलाही त्यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी कोल्हापूरच्या चंदगडमध्ये भगवान श्री नृसिंह मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी ‘मी पुन्हा येईन’, असं विधान केलं होतं. “पाटीलसाहेब, तुम्हाला एवढंच सांगतो की इथे एकदा येऊन मन भरत नाही. त्यामुळे मी पुन्हा येणार आहे. तुम्हाला माहितीये की जेव्हा मी सांगतो मी पुन्हा येईन, तेव्हा मी नक्की येतो. कसा येतो हेही तुम्हाला माहिती आहे. आपलं कुलदैवतच नरसिंग आहे. आपण कुठूनही प्रगती करतो”, असं ते म्हणाले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here