पुणे,दि.९: भाजपाने मिशन बारामतीवर लक्ष केंद्रित केले आहे. सध्या भाजपाने बारामती मतदारसंघावर लक्ष्य केंद्रीत केल्याचं दिसत आहे. त्यावरून भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चांगलंच शाब्दिक युद्ध सुरू आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती मतदारसंघ पवारमुक्त करणार असल्याचं मत व्यक्त केलं. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “एखादी व्यक्ती नव्याने प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा त्यांच्या बातम्या होणंहीतितकंच महत्त्वाचं असतं,” असं म्हणत पवारांनी बावनकुळेंना टोला लगावला. ते शुक्रवारी (९ सप्टेंबर) पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेले असताना एबीपी माझाशी बोलत होते.
रोहित पवार म्हणाले, “जेव्हा एखादी व्यक्ती नव्याने प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा त्यांच्या बातम्या होणंही तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे चंद्रशेखर बावनुळे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रयत्न करतील. मात्र, बारामतीत आमचा लोकांवर विश्वास आहे. तिथले लोक कोणत्या बाजूचे आहेत, कोणत्या विचाराचे आहेत हे आम्हाला माहिती आहे.”
“आज बारामती पवारमुक्त करायची, मुंबई ठाकरेमुक्त करायची या दोन विषयांवर भाजपाचं राजकारण केंद्रीत आहे. मात्र, सामान्यांच्या रोजगाराचे प्रश्न, बेरोजगारी कमी करणं, शेतकऱ्यांचे विषय, शहरी-ग्रामीण विषय यावर भाजपाचे नेते बोलत नाहीत,” असं रोहित पवार यांनी म्हटलं.
“आधी चंद्रशेखर बावनकुळे, मग देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्रीही बारामतीत येणार आहेत. भाजपाच्या दाव्याप्रमाणे बारामतीत सुप्रिया सुळेंचा पराभव होईल का?” असा प्रश्न विचारला असता रोहित पवार म्हणाले, “भाजपाच्या नेत्यांनी बारामतीत आलंच पाहिजे. तेथे झालेला विकास त्यांनी समजून घेतला पाहिजे. तसेच बारामतीत जो विकास झालाय त्या मुद्द्यावरूनच राजकारण करायला हवं.”
“मी गणपती बाप्पांकडे सत्तेची प्रार्थना केली नाही. मात्र, राजकारणाची पातळी खाली जात आहे. त्याऐवजी लोकांच्या विकासावर राजकारण व्हावं आणि सुडाचं राजकारण थांबावं. भावनिक विषयांवर राजकारण न होता विकासाच्या मुद्द्यांवर राजकारण व्हावं, अशी प्रार्थना मी गणपतीरायांना केली,” असंही रोहित पवारांनी नमूद केलं.