“शरद पवारांनी तीन पर्याय दिले होते…” आमदार रोहित पवार

0

मुंबई,दि.२२: अजित पवारांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादी पक्षात फूट पडली. अजित पवारांचा शपथविधी सुरू झाला तेव्हा शरद पवारांनी तीन पर्याय दिले होते. आपण तिसरा पर्याय निवडला असे आमदार रोहित पवार म्हणाले. अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. २ जुलै २०२३ रोजी अचानक अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यादिवशी अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदारांना समर्थन मागण्यासाठी फोन केले होते. पण त्यादिवशी अजित पवारांनी आपले पुतणे आणि आमदार रोहित पवार यांना समर्थन मागण्यासाठी फोन केला होता का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर स्वत: रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे.

२ जुलैच्या दुपारच्या शपथविधीसाठी तुम्हाला फोन आला होता का? आला असेल तर कुणी केला होता? त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं? असा प्रश्न विचारला असता रोहित पवार म्हणाले, “माझे काका (अजित पवार) मला खूप चांगल्याप्रकारे ओळखत असावेत, म्हणून मला कुणाचाही फोन आला नाही. मी भूमिका बदलेल असं त्यांना वाटत नव्हतं, त्यामुळे मला फोन आला नाही. मला त्या शपथविधीबाबत काहीही कल्पना नव्हती.”

“जेव्हा तो निर्णय घेतला आणि शपथविधी सुरू झाला, तेव्हा मी शरद पवारांबरोबर होतो. तेव्हा शरद पवारांच्या चेहऱ्यावर कुठेही हावभाव बदलले नाहीत. शेवटी ते एकच म्हणाले, “आता लढावं लागेल”. त्यांनी मला तीन पर्याय दिले होते. पहिला पर्याय म्हणजे राजकारण सोडून द्यायचं आणि उद्योगाकडे लक्ष द्यायचं. दुसरा पर्याय म्हणजे निर्णय बदलायचा आणि पलीकडे (अजित पवार गट) जायचं आणि तिसरा पर्याय म्हणजे इथेच राहायचं आणि संघर्ष करायचा. मी तिसरा पर्याय निवडला,” असं रोहित पवार म्हणाले. ते ‘एबीपी माझा’च्या एका कार्यक्रमात बोलत होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here