सोलापूर,दि.२४: Rohini Tadwalkar On Solapur BJP Resignation Session: सोलापूर भाजपा राजीनामा सत्र | भारतीय जनता पक्ष सोलापूर (BJP Solapur) शहर कार्यकारिणीतील राजीनामा सत्राबाबत मी प्रदेश भाजपला कळविले आहे. यानंतर लवकरच प्रदेशकडून राजीनामे दिलेल्यांच्या भावना जाणून घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. या राजीनामा दिलेल्या शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राजीनाम्याचा फेरविचार करावा, असे आवाहन भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर (Rohini Tadwalkar) यांनी केले.
भाजपाच्या शहराध्यक्ष तडवळकर यांनी काही दिवसांपूर्वी कार्यकारिणी जाहीर केली होती. ही नावे जाहीर केल्यानंतर शहर उत्तर मतदार संघातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी उफाळून आली. नवनियुक्त काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. या पाठोपाठ कार्यकारिणीमध्ये धनगर समाजाला डावलल्याबद्दल या समाजाच्या 65 कार्यकर्त्यांनीदेखील आपले राजीनामे सोपविले.
या राजीनामा सत्राबाबत मंगळवारी पत्रकारांनी भाजपा शहराध्यक्ष तडवळकर यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, शहर कार्यकारिणी गठित करण्यापूर्वी मी शहराध्यक्ष या नात्याने शहरातील सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, आणि देवेंद्र कोठे या तीनही आमदारांना पत्र दिले होते, मात्र यापैकी आमदार विजयकुमार देशमुख यांनी नावांची यादी पाठवली नाही.
तरीदेखील मी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शहर उत्तर मतदारसंघातील भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना कार्यकारिणीमध्ये संधी दिली. तरीदेखील नियुक्ती झालेल्यांपैकी काहींनी तसेच अन्य कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले, याचे दुःख वाटते. वास्तविक कार्यकारिणीमध्ये कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे नाराजीचे काहीच कारण नाही, असे त्या म्हणाल्या.
राजीनामा सत्राबाबत प्रदेश भाजपाला कळविले आहे. यानंतर लवकरच प्रदेशकडून राजीनामे दिलेल्यांच्या भावना जाणून घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर पक्षात नाराजीचे वातावरण अयोग्य आहे. तेव्हा राजीनामा दिलेल्यांनी राजीनामा निर्णयावर फेरविचार करावा, असे आवाहन तडवळकर यांनी केले.








