महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या पर्यावरण संवर्धनाच्या आवाहनाला गणेशोत्सव मंडळांचा प्रतिसाद!

0

सोलापूर,दि.9: महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या आवाहनाला अनेक गणेशोत्सव मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्यावतीने आपल्या तीन फुटावरील मोठ्या श्री गणेश मुर्तीचे विसर्जन तुळजापूर रोड येथील दगड खाणीत करण्यात आल्याचे चित्र पहावयास मिळाले.
   
श्री गणेश विसर्जनासाठी शुक्रवारी  महापालिका प्रशासनाकडून तुळजापूर रोड येथील दगड खाणीत  व्यवस्था करण्यात आली. सकाळी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप , पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर , नगर अभियंता संदीप कारंजे, उपअभियंता एस.एम.आवताडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत संकलीत केलेल्या बाप्पाच्या मुर्तीची विधीवत आरती करण्यात आली. विधीवत बाप्पाची पुजा झाल्या नंतर  “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या !” च्या जय घोष करण्यात आला.  क्रेनच्या सहाय्याने दगडखाणीत उतरून  बाप्पाची मुर्तीचे मनोभावे विसर्जन करण्यात आले.

शहरात पर्यावरण पूरक श्रीगणेश विसर्जन करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आवाहनाला प्रतिसाद दिल्याने आयुक्त पी. शिवशंकर यांनी समाधान व्यक्त केले. इतरही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी मोठ्या मूर्त्या पालिका प्रशासनाकडे सुपूर्द करावेत असं आवाहनही पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी यावेळी केलं.


     
दरम्यान, पालिका आयुक्तांनी केलेल्या आवाहनाला विसर्जनाच्या दिवशी सार्वजनिक मंडळाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दगडखाणीवर पहावयास मिळाले यावेळी कोणताही जिवितहानी होऊ नये म्हणून जीवरक्षकासह पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

तुळजापूर रोडवरील खाण येथे अशी केली व्यवस्था !

तुळजापूर रोडवरील खाणीमध्ये संकलित केलेल्या मुर्त्यांचे विसर्जन करण्याकरिता महापालिकेच्या वतीने नेटकी व्यवस्था करण्यात आली. महापालिका आयुक्त पि.शिवशंकर यांनी शुक्रवारी याठिकाणी बराच वेळ तळ ठोकून उपस्थित होते. खाण्याच्या परिसरात आलेल्या मोठ्या गणपतीचे विसर्जन आयुक्त पि. शिवशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली विधिवत पूजा करून खाणीत विसर्जन करण्यात आले. तुळजापूर रोडवरील या खाण परिसरात लाईटची व्यवस्था करण्यात आली. या ठिकाणी महापालिकेचे 30 कर्मचारी व अधिकाऱ्यांचे पथक दोन शिफ्ट मध्ये तैनात राहणार आहेत. सुमारे सात अभियंतेही उपस्थित होते.

सकाळी 9 ते 5 व सायंकाळी 5 ते रात्री 12 पर्यंत या दोन शिफ्ट मध्ये कर्मचारी कार्यरत  आहेत. दोन क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. आत आणि बाहेर जाण्याकरिता दोन मार्ग ठेवले आहेत. पोलीस व महापालिका पथकासाठी मंच तयार करण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याची ही व्यवस्था करण्यात आली आहे.  वाहतुकीसाठी 70 गाड्या तैनात  आहेत तसेच महापालिकेचे 600 कर्मचारी कार्यरत  आहेत. त्याचबरोबर मक्तेदाराकडून  400 कामगार उपलब्ध करून घेण्यात आले आहेत अशी माहिती महापालिका आयुक्त पि.शिवशंकर यांनी दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here