शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांना आरोपी न करण्यासाठी मागितली पाच लांखाची खंडणी

0

मुंबई,दि.३: गुन्हेगार राजकीय नेत्यांच्या नावाने किंवा पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने खंडणी मागत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू (MLA Sunil Prabhu) यांच्याकडून पाच लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले आहे. गुजरातमधील एका पोलिस ठाण्याचा अधिकारी बोलत असल्याचे सांगत या तोतयाने फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. हत्येच्या गुन्ह्यात अटक केलेल्या एका आरोपीने प्रभूंचे नाव घेतले आहे, असे या तोतयाने सांगितले. या गुन्ह्यात प्रभू यांना आरोपी न करण्यासाठी त्याने पैशांची मागणी केली.

पोलिसांनी या प्रकरणाची शहानिशा केली असता असा कुणीच अधिकारी नसल्याचे समोर आले. या प्रकरणी कुरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुरार पोलिस ठाण्यात २८ ऑक्टोबर रोजी गुजरात सीमेवरील संजान पोलिस ठाण्यातून एक फोन आला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव रमेशसिंग चौहान असल्याचे सांगत पोलिस अधिकारी असल्याची बतावणी केली. आम्ही एका आरोपीला पिस्तूलसह अटक केली असून हे शस्त्र घेण्यासाठी आमदार सुनील प्रभू यांनी मदत केल्याचे तो सांगत आहे. तसेच त्याने एक हत्या केली असून तीदेखील प्रभू यांच्या सांगण्यावरून केली आहे. ही माहिती देतानाच रमेशसिंगने प्रभू यांचा मोबाइल क्रमांक आणि पत्ता विचारला.

कुरार पोलिसांनी त्यांना मोबाइल क्रमांक आणि घरचा पत्ता मिळवून देतो असे सांगितले. काही वेळाने पुन्हा या अधिकाऱ्याचा फोन आला आणि त्याने प्रभू यांच्याशी बोलणे झाले असून त्यांनी सहकार्य न केल्यास कारवाई करावी लागेल, असे तो सांगू लागला. प्रभू यांनीदेखील कुरार पोलिसांना फोन करून हा सर्व प्रकार सांगितला. पिस्तूल आणि हत्येच्या गुन्ह्यात कारवाई टाळण्यासाठी हा अधिकारी ५ लाख रुपये मागत असल्याचे त्यांनी सांगितले. कुरार पोलिसांनी या नावाचा कुणी अधिकारी आहे का, याची शहानिशा करण्यासाठी चौकशी केली असता असा कुणीच अधिकारी नसल्याचे समोर आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here