सातारा,दि.3: भाजपाच्या नेत्याने ईव्हीएम (EVM) हॅक करून दाखवणाऱ्याच्या नावावर संपूर्ण प्रॉपर्टी करणार असल्याचे सांगत EVM हॅक करून दाखवण्याचे चॅलेंज दिले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळाले. यावरून विरोधकांनी ईव्हीएम घोटाळा करत भाजपाने निवडणूक जिंकली आहे, असा आरोप केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) आमदार उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनीही बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणूक घेऊन दाखवावी असे चॅलेंज दिले होते.
निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायचे ठरवले आमदार उत्तम जानकर यांनी राजीनामा द्यायची तयारी दर्शवली आहे. जानकर यांनी दावा केला होता की, महाराष्ट्रातील 150 विधानसभा मतदारसंघांमध्ये गडबड झाली आहे. या गडबडीची सखोल चौकशी केल्यास अजित पवारही 20 हजार मतांनी पराभूत झाल्याचे दिसून येते.
जानकर यांच्या म्हणण्यानुसार महायुतीला ईव्हीएम हॅक केल्याने यश मिळाले आहे. यावर आता भाजपाचे माढ्याचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर (Ranjeetsinh Naik Nimbalkar) यांनी चॅलेंज दिले आहे. जो कोणी ईव्हीएम हॅक करून दाखवेल त्याच्या नावावर संपूर्ण प्रॉपर्टी करणार आहे, असे रणजीतसिंह निंबाळकर म्हणाले.
रणजितसिंह म्हणाले, ईव्हीएमबाबत आरोप करणारे आ. उत्तमराव जानकर माझे चांगले मित्र आहेत. त्यांना परवाच फोन करून मी सल्ला दिला होता की उत्तमराव महाराष्ट्राच्या जनतेच्या डोक्यात संभ्रम निर्माण करायचं सोडून द्या. जर तुमच्याकडे ईव्हीएम मशीन हॅक करण्याची यंत्रणा असेल तर निवडणूक आयोगाचे चॅलेंज स्वीकारा. ईव्हीएम मशीन हॅक करून दाखवा. रणजितसिंह ना. निंबाळकर हे त्यांची जेवढी प्रॉपर्टी असेल ती सर्व आमदार उत्तमर जानकर यांच्या नावावर करायला तयार आहे.