रामदास कदम संजय राऊत भेटीमुळे तर्क-वितर्कांना उधाण

0

मुंबई,दि.२: शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतली. रामदास कदम हे शिवसेनेवर नाराज आहेत. शिवसेना नेते रामदास कदम गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि रामदास कदम यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचंही बोललं जात आहे. त्यातच रामदास कदम आज शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. त्यांच्या या अचानक भेटीमुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. यावेळी त्यांना प्रसारमाध्यांनी तुम्ही भाजपाचा भगवा खांद्यावर घेणार आहे का? असं विचारलं असता त्यांनी उत्तरही दिलं.

भाजपा नेते किरिट सोमय्या यांना दापोलीतील साई रिसॉर्टची माहिती रामदास कदम यांनी पुरवल्याचा आरोप होत होता. यामुळे रामदास कदम आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. त्यानंतर रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत थेट पक्षाच्या नेत्यांवरच टीका केली होती. अनिल परब यांचा त्यांनी गद्दार असा उल्लेख केला होता. अनिल परब यांनी पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला असून शिवसेनेलाच संपवायला निघालेत, असा आरोप त्यांनी केला होता. याशिवाय त्यांनी उदय सामंत, माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यावरही निशाणा साधला होता.

संजय राऊत भेटीनंतर प्रसारमाध्यमांनी रामदास कदम यांना भाजपाचा भगवा खांद्यावर घेणार आहे का? अशी विचारणा केली. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, “मी जिवंत असेपर्यंत, मरेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही. पक्षाशी कधीही बेईमानी करणार नाही. कितीही अफवा आणि बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी त्यामध्ये कोणतंही तथ्य नाही. मी स्वत:ला डाग कधीच लावून घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा, शिवसेना प्रमुखांचा, शिवसेनेचा भगवा झेंडा मरेपर्यंत माझ्या खांद्यावर असेल, त्याची साथ कदापि सोडणार नाही”.

मुख्यमंत्री जामखेड, खेडला येऊ शकत नाही त्यामुळे आमंत्रण करण्याचा प्रश्न कुठेही उद्बवत नाही असंही यावेळी ते म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here