मुंबई,दि.१८: मी मरेपर्यंत शिवसेना सोडणार नाही, शिवसेनेतून माझी हकालपट्टी केली तरी, मी शिवसैनिक म्हणून जगेन असे शिवसेना (Shivsena) नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी म्हटले आहे. कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींची नाराजी आणि रत्नागिरीत शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करताना समर्थकांना डावलल्यामुळं नाराज असल्यानं शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज, मुंबईत पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांच्यावर निशाणा साधला. माझं राजकीय आयुष्य संपवण्याचा कट आखला गेला, असा आरोप कदम यांनी केला. उद्धव ठाकरे हे सध्या शिवसेना पक्षप्रमुख आहेत की, अनिल परब असा सवाल त्यांनी केला.
शिवसेनेसाठी अख्खं आयुष्य घालवलं. 52 वर्ष संघर्ष केले. पक्षाची वाईट वेळ असताना उद्धव ठाकरेंच्या गाडीत पुढच्या सीटवर मी स्वत: बसलो होतो. कडवट, निष्ठावंत असतानाही आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला जातो अशी खंत रामदास कदमांनी बोलून दाखवली.
रामदास कदम म्हणाले की, मी भाजपात जाणार असल्याच्या बातम्या स्थानिक वृत्तपत्रात छापून आणायच्या आणि ते उद्धव ठाकरेंना दाखवायचं असा डाव अनिल परबांचा आहे. मला उद्धव ठाकरेंनी वेळ दिला तर त्यांच्यासमोर हे सगळं मांडेन. अनिल परब यांचे मत हे उद्धव ठाकरेंचे मत आहे का? हे स्पष्टीकरण मिळाल्यावरच पुढचा निर्णय घेऊ. अनिल परबासारखी माणसं शिवसेना संपवतायेत. भगवा झेंडा शिवसेनेचा आहे परंतु भाजपाचा नाही. अनिल परबांची भूमिका, उद्धव ठाकरेंची भूमिका काय असेल त्यावर पुढचा निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितले.
शिवसेना नेते रामदास कदम हे शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करणार असल्याची चर्चा होती. मात्र, मी मरेपर्यंत शिवसेना सोडणार नाही, पण मुलं निर्णय घ्यायला मोकळी आहेत, असेही रामदास कदम यांनी यावेळी स्पष्ट केले. शिवसेनेतून माझी हकालपट्टी केली तरी, मी शिवसैनिक म्हणून जगेन, असंही ते म्हणाले.
मी मरेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही. परंतु माझ्या मुलांच्या आणि इतर समर्थकांच्या भवितव्यासाठी मला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल असा इशारा शिवसेनेचे नाराज नेते रामदास कदम यांनी दिला आहे.