मुंबई,दि.22: महाविकास आघाडीत फूट पडणार असल्याचा दावा शिवसेना (शिंदे गट) नेत्याने केला आहे. महाविकास आघाडीत जागा वाटपावरून तेढ निर्माण झाली आहे. जागावाटपावरुन महाविकास आघाडी आणि महायुतीच्या वारंवार चर्चा आणि बैठका होत आहे. ऐन निवडणुकीत राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. सध्या जागा वाटपामध्ये महायुतीने आघाडी घेतली आहे. काही जागांवर मतभेद असले तरी ते सामोपचाराने सोडवण्याचे तंत्र आणि मंत्र त्यांनी अवलंबला आहे.
तर दुसरीकडे महाविकास आघाडीत जागा वाटपावरून तीव्र मतभेद समोर आलेले आहेत. आता अगदी थोड्याच वेळात महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा होणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. पण त्यापूर्वीच शिवसेनेच्या एका जुन्या नेत्याने खळबळजनक दावा केला आहे.
ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधील मतभेदामुळे महाविकास आघाडी तुटल्याचे काही तासांमध्ये समोर येईल असा दावा शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला आहे. मला मिळालेली माहिती ही गोपनीय असल्याचेही रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
उध्दव ठाकरे, नाना पटोले मुख्यमंत्री होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. त्यावरून दोघांमध्ये कलगीतुरा रंगल्याचा आरोप त्यांनी केला. शरद पवार हे दोन्ही पक्षांना संपवतील, असा दावा रामदास कदम यांनी केला आहे.