शिवसेनेतून रामदास कदम व आनंद अडसूळ यांची हकालपट्टी

0

मुंबई,दि.18: शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिवसेना नेते पदाचा राजीनामा दिला होता. शिवसेनेकडून रामदास कदम यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कदम यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. कदम यांच्यासोबतच शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचीदेखील हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तसे आदेश दिल्याची माहिती शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाने दिली आहे.

मागील काही दिवसांपासून रामदास कदम पक्षनेतृत्वावर नराज होते. आपली ही नाराजी कदम यांनी आज उद्धव ठाकरे यांना पत्रामार्फत कळवत पक्षनेतेपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. या पत्रात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक आरोप केले. “शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी माझी शिवसेना नेतेपदी नियुक्त केली होती. मात्र, शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेतेपदाला कुठलीही किंमत राहिली नाही, हे मला पहायला मिळालं,” अशी खदखद रामदास कदम यांनी बोलून दाखवली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रामदास कदम यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला.

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचीदेखील शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अडसूळ यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अडसूळ शिंदे गटात सामील होण्याची शक्यता वर्तविली जात होती. तसे संकेत अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांनी दिले होते. “गेल्या कित्येक वर्षांपासून एकनाथ शिंदे जेव्हा मंत्री होते, तेव्हा मी हक्काने त्यांच्याकडे जायचो. अगदी रात्री 2 वाजता देखील त्यांच्याकडे गेलो, तरी त्यांचे दरवाजे उघडे असायचे. त्यामुळे गट-तट मी मानले नाहीत. मी शिवसैनिक आहे. एकनाथ शिंदे दाखवतील, त्या दिशेने चालणारा मी शिवसेना कार्यकर्ता आहे,” असे अभिजित अडसूळ यावेळी म्हणाले होते. त्यामुळे आनंदराव अडसूळ यांनी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे आज आदेश दिले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here