Ramdas Athawale: केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंनी शिवसेने बाबत केलं मोठं वक्तव्य

0

दि.११: Ramdas Athawale On Shivsena: आरपीआयचे (RPI) अध्यक्ष केंद्रीयमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालावरून शिवसेनेबाबत मोठं वक्तव्य केले आहे. पाच राज्यांपैकी चार राज्यात भारतीय जनता पार्टीने बहुमत मिळवले आहे. भाजपानं चार राज्यांत सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. पंजाबमध्ये देखील आपनंच बाजी मारल्यामुळे काँग्रेससाठी या निवडणुकीत हाती काहीही न लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसप्रमाणेच शिवसेनेलाही कुठेच यश न मिळाल्याची चर्चा आता महाराष्ट्रात सुरू झाली आहे. यासंदर्भात आता रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तसेच, राज्यात भाजपा सोबत आली नाही, तर लोकसभेत शिवसेनेला ४ जागाही मिळणार नाहीत, असं रामदास आठवले एबीपीशी बोलताना म्हणाले आहेत.

“शिवसेनेला यश मिळणं शक्यच नाही”

“मला वाटतं शिवसेनेला बाहेरच्या राज्यात यश मिळण्याचा प्रश्नच येत नाही. शिवसेनेपेक्षा माझा पक्ष इतर राज्यांत ताकदवान आहे. मणिपूरमध्ये तर माझा उमेदवार फक्त १८३ मतांनी हरला आहे. पोस्टल वोटमध्ये तो हरला. नॉर्थ इस्टमध्ये सगळ्या राज्यांत माझा पक्ष आहे. त्यामुळे शिवसेनेला बाहेरच्या राज्यांत यश मिळणं अशक्य आहे”, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

महाविकास आघाडीचं पानिपत होणार

दरम्यान, राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचं येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये पानिपत होणार असल्याचं रामदास आठवले म्हणाले. “महाराष्ट्रात भाजपाच्या सोबत शिवसेना राहिली नाही, तर लोकसभेच्या तीन-चार जागा निवडून येतील की नाही अशी शंका आहे. विधानसभेच्या निवडणुकीत तर त्यांचं पानिपत होणार आहे. कारण महाविकास आघाडीतले तीन पक्ष परस्परांच्या विरोधात उभे राहणारे पक्ष आहेत. त्यामुळे येणाऱ्या मुंबई महानगर पालिका निवडणुकीत आणि इतर स्थानिक निवडणुकांमध्ये आम्हाला प्रचंड यश मिळणार आहे”, असं आठवले म्हणाले.

“काँग्रेसला भवितव्य नाही”

यावेळी बोलताना आठवलेंनी काँग्रेसवर देखील निशाणा साधला आहे. “काँग्रेस पक्षानं बदल जो काही करायचा आहे, तो त्यांचा अधिकार आहे. पण राहुल गांधी आणि प्रियांका गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस वाढेल अशी स्थिती अजिबात नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाला भवितव्य मला दिसत नाही”, असं आठवले म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here