Ramdas Athawale: रामदास आठवले मनसे आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हाबद्दल स्पष्टच बोलले

0

लोणावळा,दि.१२: आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) मनसे आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हाबद्दल स्पष्टच बोलले आहेत. भाजपा मनसे युतीबाबत रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपा मनसे (BJP MNS Alliance) युतीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगामी निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेवर भाजपा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना व आरपीआयचा झेंडा फडकणार, उद्धव ठाकरे यांचे मुंबईवरील वर्चस्व खालसा करण्यासाठी आरपीआय भाजपा व शिंदे गटाला सहकार्य करणार आहे, अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केली. मनसेला भाजपने सोबत घेऊ नये, अशी इच्छाही आठवलेंनी बोलून दाखवली.

शिवसेनेच्या वादा संदर्भात आम्ही यापूर्वीच भूमिका व्यक्त केली असून, खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे. मात्र धनुष्यबाण चिन्ह गोठविण्याच्या भूमिकेला आमचा पाठिंबा नाही. धनुष्यबाण हा शिवसेनेचा अंतर्गत विषय असला तरी, शिंदे गटाकडे असलेले सध्याचं राजकीय संख्याबळ व संघटनेतील प्राबल्य पहाता धनुष्य बाणावर शिंदे गटाचाच अधिकार आहे. आणि त्यांनाच धनुष्यबाण चिन्ह मिळेल, असे मतही रामदास आठवले यांनी मांडले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांची राज्य कार्यकारणीची बैठक रविवारी लोणावळ्यात संपन्न झाली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आरपीआयचे नवोदित प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे, कार्याध्यक्ष बाबुराव कदम, सरचिटणीस गौतम सोनवणे, प्रदेश युवकाध्यक्ष पप्पू कागदे, आरपीआयचे पुणे जिल्हाध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, कार्याध्यक्ष अशोक गायकवाड, सरचिटणीस जितेंद्र बनसोडे उपस्थित होते.

यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांच्या चुकीमुळेच शिवसेनेत फूट पडली आहे. जर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय घेतला नसता, तर शिवसेनेतील फूट टळली असती. उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळेच त्यांना जबर धक्का बसला. अन् तो एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. मात्र एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा निर्णय अगोदर दीड वर्षांपूर्वी घ्यायला पाहिजे होता. असे असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अहोरात्र राज्य व जनतेसाठी करत असलेले काम हे कौतुकास्पद आहे. त्यांनी शेतकरी व समाजाच्या हितासाठी घेतलेले निर्णय स्वागतार्ह आहे. तसेच १६ आमदारांच्या निलंबनाचा निर्णय व विधानसभा उपाध्यक्षांनी काढलेला काढलेला व्हिप हा बेकायदेशीर व घटनाबाह्य असल्याचे यावेळी आठवले यांनी सांगितले.

मुंबईमध्ये दलित व बहुजन समाजासह परप्रांतीयांच्या विविध समाजातील दलित व बहुजन समाजाचीही संख्या मोठी आहे. तसेच झोपडपट्ट्यांमध्ये आरपीआयची ताकद मोठी आहे. यामुळे मुंबई महापालिकेवर भाजपा, शिवसेना शिंदे गट व आरपीआयची सत्ता येईल. असा विश्वास आहे. मुंबईत उद्धव ठाकरे यांची शिवसेना दुबळी झाली असून, त्यांची अवस्था दयनीय आहे. तसेच काँग्रेस पक्ष तर फारच दुबळा झाल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची व काँग्रेसची सत्ता येण्याची चिन्हे अजिबात नाही. तसेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची व राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत एकत्र आली तरी, मुंबईत राष्ट्रवादीची ताकद नाही. त्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद कमी झाल्याने त्यांना मुंबईत सत्ता मिळणे अशक्य असल्याचे यावेळी आठवले बोलले.

मुंबईत भाजपा, एकनाथ शिंदे गट व आरपीआय एकत्र लढलो तर मुंबईत आमच्या युतीला किमान १५० पेक्षा अधिक जागा मिळतील. तसेच मुंबई महानगर पालिकेमध्ये आरपीआयला २२ ते २५ जागा मिळाव्यात अशी युतीकडे मागणी करणार आहे. त्याचप्रमाणे मनसेला भाजपने सोबत घेऊ नये, कारण मनसेच्या परप्रांतीया संदर्भातील भूमिकेचा राष्ट्रीय पातळीवर नकारात्मक संदेश जाईल. मनसेची परप्रांतीयांबद्दल असलेले भूमिका आम्हाला मान्य नसल्याचे यावेळी आठवले यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here