रामदास आठवलेंनी काँग्रेसला दिली ऑफर, नाना पटोले यांना दिला सल्ला

0

भंडारा,दि.२०: केंद्रीयमंत्री आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी काँग्रेसला सोबत येण्याची ऑफर दिली आहे. कांग्रेसवर होत असलेल्या अत्याचार लक्षात घेता नाना पटोले यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडावे असा, सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. इतकच नाही तर पटोले यांनी आमच्या सोबत यावं अशी ऑफर रामदास आठवलेंनी दिलीय. नाना पटोलेंचा मतदारसंघ असणाऱ्या भंडाऱ्यामध्ये पत्रकारांशी चर्चा करताना आठवलेंनी ही ऑफर दिली.

अनेकदा शिवसेना आणि भाजपाच्या युतीसंदर्भात आठवले यांनी भाष्य केलं आहे. अजूनही वेळ गेलेली नाही म्हणत शिवसेना आणि भाजपा राज्यामध्ये पुन्हा युतीच्या माध्यमातून सत्तेत येऊ शकते असं अनेकदा आठवले यांनी जाहीर पत्रकार परिषदांमध्ये म्हटलं आहे. मात्र आता त्यांनी थेट काँग्रेसलाच भाजपासोबत येण्याची ऑफर दिलीय.

भाजपा सत्ता स्थापनेसाठी फोडाफोडीचे राजकारण करत असून यात भाजपला यश मिळत नाही या प्रश्नावर बोलतांना रामदास आठवलेंनी थेट काँग्रेसला ऑफर दिली आहे. “सध्या नाना पटोलेसारखे डॅशिंग नेत्याची त्यांच्या कांग्रेस पक्षाला आवश्यकता आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये मात्र त्यांना म्हणावं तितकं महत्व मिळत नाही. त्यामुळे नाना पटोलेंनी सोनिया गांधींशी बोलून सरकारमधून पाठिंबा काढण्याचं आमचं निवेदन आहे,” असं आठवले म्हणालेत.

राज्याच्या राजकारणामध्ये सध्या केंद्रस्थानी असलेल्या भोंग्याच्या विषयांवरुनही आठवलेंनी राज ठाकरेंना सुनावलं आहे. “भोंगे काढण्याचा विषय राज ठाकरेंनी करु नये. भोंगे काढण्याची सोंगं राज ठाकरेंनी करु नये. दादागिरी फक्त आपल्याला करता येते असं अजिबात नाहीय. दादगिरीला दादागिरीने सुद्धा उत्तर दिलं जाऊ शकतं. त्यामुळे अशापद्धतीची भूमिका त्यांनी घेऊ नये. भोंगे काढलेच नाही तर अशाप्रकारचा धमकी वजा इशारा देणं चुकीचं आहे. याचा विचार महाराष्ट्र सरकारने करणे अत्यंत आवश्यक आहे. मुस्लीम धर्मियांचं संरक्षण करणं ही त्यांची जबाबदारी आहे,” असंही आठवलेंनी म्हटलंय.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here