मुंबई,दि.१६: Ram Kadam On Kambalwale Baba: कंबलवाले बाबा प्रकरण भाजपा आमदार राम कदम यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पाण्यात तरंगणारे बाबा, तव्यावर बसणारे बाबा, सरपटणारे बाबा असे अनेक बाबा आणि त्यांचे अजब कारनामे पाहिलेत. पण सध्या एका कंबलवाल्या बाबाची चर्चा आहे. मुंबईत भाजपा आमदार राम कदम यांच्या उपस्थितीत त्यांच्या मतदारसंघात एका राजस्थानातील कंबलवाले बाबाने अंगावर घोंगडे टाकून विकलांग व्यक्तींना बरं करण्याचा दावा केला. यावर आक्षेप घेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने राजस्थानातील बाबाविरोधात जादूटोणा विरोधी कायद्याखाली कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर, विद्या चव्हाण , ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे इत्यादींनी सडकून टीका केली. यानंतर राम कदम यांनी या टिकेल्या प्रत्युत्तर दिलं आहे. ते शुक्रवारी (१५ सप्टेंबर) माध्यमांशी बोलत होते.
राम कदम म्हणाले… | Ram Kadam On Kambalwale Baba
राम कदम म्हणाले, “मी स्वतः विज्ञानाचा विद्यार्थी आहे. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा मी मानत नाही. मी स्वतः कंबलवाल्या बाबांच्या वेगवेगळ्या शिबिरांना गेलो. मी माझ्या आई-वडिलांनाही कंबलवाल्या बाबांकडे घेऊन गेलो. त्यांनाही आराम मिळाला. अनेक मित्रमंडळींना आराम मिळाला, फायदा झाला. तेव्हा लक्षात आलं की, कंबलवाले बाबा अंधश्रद्धा पसरवत नाही.”
रुग्णांना मिळतो आराम
“याला ॲक्युप्रेशर म्हणा किंवा नसांची माहिती म्हणा, जे काही असेल, पण रुग्णांना जागच्या जागी आराम मिळतो. माझ्या घाटकोपरमध्ये मागील पाच दिवसांमध्ये हजारो लोकांना त्याचा फायदा झाला आहे,” असा दावा राम कदम यांनी केला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या…
सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या, “दिव्यांग व्यक्तींच्या अंगावर घोंगडे टाकून त्यांना बरं करण्याचा दावा राजस्थान येथील एक बाबा करीत आहे. मुंबईतील घाटकोपर भागात भाजपा आमदाराच्या उपस्थितीत ती व्यक्ती महिलांना संतापजनक पद्धतीने स्पर्श करते. महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात असूनही त्याच्यावर कारवाई होत नाही ही खेदाची बाब आहे.”
काहीही झालं तरी ‘आपलं बोलून मोकळं व्हायचं’ म्हणणारे हे सरकार, महिलांचा राजरोसपणे विनयभंग होत असताना खंबीर पावले कधी उचलणार आहे? अशा व्यक्ती ज्या आमदाराचा आधार घेऊन अशा पद्धतीने अंधश्रद्धा पसरविण्याचे काम करतात त्या आमदारावर शासन कारवाई करण्याची तसदी घेणार आहे का? अशा भोंदू बाबा आणि अंधश्रद्धेला प्रागतिक विचारांच्या महाराष्ट्रात थारा देता कामा नये,” असं मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं होतं.