निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला तिकीट दिले तर…

0
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार

जयपूर,दि.२: निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू झाली आहे. गुन्हेगारांचा राजकारणात प्रवेश रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने नवे पाऊल उचलले असून, राजकीय पक्षांना गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला तिकीट का दिले, याचे स्पष्टीकरण वृत्तपत्रातून द्यावे लागणार आहे. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनाही वर्तमानपत्रात जाहिराती देऊन त्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड काय आहे याची माहिती द्यावी लागणार आहे.

जयपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, निवडणूक आयोग मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी कटिबद्ध असून, सर्वसामान्यांना मतदान करणे सोपे जावे आणि मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. सक्तीच्या मतदानासाठी आयोगापुढे कोणताही प्रस्ताव नसल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

घरातून मतदान करता येणार

राजस्थानमध्ये प्रथमच घरून मतदान करण्याची सुविधा वृद्ध, ४० टक्के अपंग असलेल्यांना देण्यात येईल. यासाठी मतदारांना अधिसूचना जारी झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत फॉर्म भरावा लागेल. यानंतर निवडणूक आयोग त्यांच्या घरूनच मतदान करण्याची व्यवस्था करेल.

मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आणि मतदान सोपे करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. याचवेळी विशेषतः हरयाणा आणि पंजाब सीमेवर दारू आणि रोख रक्कम याची वाहतूक रोखण्यासाठी कडक सूचना देण्यात आल्या आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here