Rajesh Tope: महाराष्ट्रातील निर्बंधाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मोठं विधानं

0

दि.२९: Rajesh Tope On Restrictions In Maharashtra: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत (Covid Third Wave) रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढणाऱ्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मास्कबंदी उठवली जाणार नसली तरी आगामी दिवसांमध्ये महाराष्ट्रातील करोना निर्बंधांमध्ये घट होऊ शकते, यादृष्टीने विचारविनिमय सुरु असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्य मंत्रिमडळाच्या बैठकीत मास्कमुक्त महाराष्ट्र, अशी चर्चा झालीच नाही. मी केवळ एवढीच विनंती केली की, युरोपीय देशांमध्ये ज्याप्रमाणे कोरोना निर्बंध हटवण्यासंदर्भात निर्णय घेतले जात आहेत त्यावरुन आपल्याला बोध घेता येईल का, याचा विचार व्हावा. इंग्लंड, डेन्मार्क, हॉलंड आणि ब्रिटनमध्ये करोना निर्बंधांबाबत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. तेव्हा केंद्रीय टास्क फोर्स आणि राज्य टास्क फोर्सने हे निर्णय कोणत्या आधारावर घेण्यात आले याचा अभ्यास करावा. जेणेकरुन त्यामधून आपल्याला काही बोध घेता येईल. यामध्ये मास्कमुक्तीचा निर्णय नव्हे तर इतर निर्बंध कमी करता येतील का, याचा अभ्यास झाला पाहिजे. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेला (ICMR) यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी राज्याने विनंती करावी, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला संमती दिल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

यावेळी राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याचे म्हटले. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील दैनंदिन रुग्णांची संख्या ४७ हजारावर पोहोचली होती. तो आकडा २५ हजारापर्यंत खाली आला आहे. याचा अर्थ रुग्णसंख्येत ५० टक्क्यांनी घट झाली आहे. राज्यात तिसऱ्या लाटेसाठी तयार करण्यात आलेले ९० ते ९२ टक्के बेडस रिकामे आहेत. अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन या सुविधांची गरज लागणाऱ्या रुग्णांची संख्या अवघी एक टक्का इतकी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा पीक येऊन गेला आहे, असे म्हणता येईल. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती, पण आता तशी परिस्थिती नाही.

पण नाशिक, पुणे, नागपूर आणि ग्रामीण भागात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पण तेथील रुग्ण प्राथमिक उपचारांमुळे बरे होत असल्याने फारशी चिंता करण्याचे कारण नाही. तसेच राज्यात करोनाच्या बीए-२ नव्या व्हेरिएंटचा शिरकाव झाला नसल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here