अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी भूमिका केली स्पष्ट

0

मुंबई,दि.१६: अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना आवाहन केले आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ठाकरे सेना- काँग्रेस-राष्ट्रवादी महायुतीच्या ऋतुजा लटके व भाजप-शिंदे सेना-रिपाइंचे मुरजी पटेल यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत शुक्रवारी अर्ज भरले. दरम्यान, या पोटनिवडणुकीत मनसे काय भूमिका घेणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. परंतु आता मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित आवाहन केलं आहे.

“आमदार कै रमेश लटके ह्यांच्या दुर्देवी निधनानंतर आज अंधेरी (पूर्व) ह्या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक आहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके ह्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. कै. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं कै. रमेश ह्यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं,” असं राज ठाकरे यांनी पत्रात नमूद केलं आहे.

मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेंव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेंव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसं करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रद्धांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं. असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्वीकार कराल, असंही त्यांनी यात नमूद केलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here