“तुम्ही बळी पडू नका तशी गरजच नाही आणि तुम्हाला सरकारकडून जबरदस्ती झाली तर…” राज ठाकरे

0

सोलापूर,दि.१८: Raj Thackeray On Hindi Language मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराष्ट्रातील शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्यास विरोध दर्शवला आहे. शाळांनी हिंदी भाषा सक्तीची करू नये असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे. राज्य सरकारने पुन्हा एकदा शैक्षणिक धोरणात त्रिभाषा सूत्र अवलंबलं आहे. त्यात हिंदीसोबत इतर भाषांचा पर्याय विद्यार्थ्यांना दिला आहे. कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्राचे हिंदीकरण होऊ देणार नाही असा इशारा राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

Raj Thackeray On Hindi Language

 

राज ठाकरे यांनी राज्यातील शाळांच्या मुख्याध्यापकांनाही पत्र पाठवले आहे. मुलांवर भाषा लादण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. जो हाणून पाडला पाहिजे. यात एकतर मुलांचे नुकसान आहेच पण मराठी भाषेचे नुकसान आहे. मुले मोठी झाल्यावर त्यांच्या गरजेनुसार हवी ती भाषा शिकू शकतात पण आतापासूनच भाषेचे ओझे त्यांच्यावर कशाला असं सांगत सरकारच्या राजकारणाला शाळांना बळी पडू नका असं राज ठाकरे यांनी पत्राद्वारे म्हटलं आहे.

राज ठाकरे यांचे पत्र | Raj Thackeray On Hindi Language

महाराष्ट्रातील तमाम शाळांच्या मुख्याध्यापकांना सस्नेह जय महाराष्ट्र,  एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रात शिक्षण विभागाचा नुसता गोंधळ सुरु आहे. आधी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवायच्या आणि त्यात मराठी, इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करायची असा निर्णय आला. ज्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कडाडून विरोध केला, पुढे त्यावर जनमत तयार झालं. पुढे जनमताचा रेटा बघून सरकारने हळूच पळवाट काढली आणि सांगितलं की हिंदीची सक्ती नसेल पण कोणाला हिंदी शिकायची असेल तर तो अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जाईल. 

हिंदी भाषेच्या सक्तीचा प्रश्नच येत नाही. कारण हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती उत्तरेतल्या काही प्रांतांमध्ये बोलली जाणारी भाषा आहे, म्हणजे एका अर्थाने ती असलीच तर राज्यभाषा आहे. त्यात ती ज्या राज्यांमध्ये बोलली जाते तिथे पण अनेक स्थानिक भाषा आहेत, ज्या हिंदीच्या वरवंट्याखाली येऊ लागल्यात आणि अशी भीती आहे की तिथल्या स्थानिक बोलीभाषा काळाच्या ओघात नष्ट होतील. अर्थात आपली स्थानिक बोलीभाषा मरु द्यायची का नाही हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, आपल्या काय देणंघेणं त्याच्याशी. 

पण महाराष्ट्रात जेंव्हा अशी सक्ती आली तेंव्हा मात्र आम्ही आवाज उठवला आणि यापुढे पण उठवत राहणार. पुढे सरकारने सांगितलं की इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील. बरं याचा लेखी आदेश अजून आला आहे का ? तसा तो कुठे आला असेल तरी आम्हाला तो दिसला नाही. कागदी घोडे नाचवण्यात हुशार असलेलं सरकार हा कागद पण नाचवून दाखवेल. मग आमचा प्रश्न आहे मग तिसरी भाषाच मुलांना शिकायची नाहीये तर मग पुस्तक छपाई का सुरु आहे. माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या निदर्शनास आलं आहे की पुस्तक छपाई सुरु आहे. याचा अर्थ सरकार छुप्या मार्गाने भाषा लादण्याचे उद्योग करणार असं दिसतंय. याला तुम्ही शाळांनी सहकार्य करू नका. 

मुलांवर भाषा लादण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, जो हाणून पाडला पाहिजे. यांत एकतर मुलांचं नुकसान आहेच पण मराठी भाषेचं नुकसान आहे. 

सरकार काय वरून जे सांगतील त्याच्या मागे घरंगळत जायला तयार आहे, पण तुम्ही बळी पडू नका. तशी गरजच नाही. आणि तुम्हाला सरकारकडून जबरदस्ती झाली तर आम्ही आहोत. मुळात त्यांना उत्तम सुशिक्षित नागरिक होऊन देशाचं तसंच महाराष्ट्राचं नाव मोठं करण्यासाठी राज्य भाषा आणि एक जागतिक भाषा शिकली म्हणजे झालं ,अजून भाषांची आत्ता खरतर काय गरज ? पण हे चाललेलं राजकारण आपण समजून घेतले पाहिजे ! उत्तरेतल्या लोकांना सुसंकृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे आणि त्यासाठीचा सोपा मार्ग म्हणजे थेट किंवा आडवळणाने त्यांची भाषा माथी मारायची. त्या राजकारणाला तुम्ही बळी पडू नका.

उद्या ती मुले मोठी झाल्यावर त्यांच्या गरजेनुसार त्यांना हवी ती भाषा ते शिकू शकतात पण आत्ता पासूनच हे ओझे त्यांच्यावर कशाला ? तुम्ही ठाम राहिलात आणि सरकारचे मनसुबे उधळून लावलेत तर आम्ही तुमच्या पाठीशी पहाडासारखे उभे राहू. पण तुम्ही स्वेच्छेने सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करून, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर भाषेचं ओझं लादणार असाल आणि अशी भाषा लादणार असाल, जी शिकली काय नाही शिकली काय, फरक पडत नाही, तर मात्र माझे महाराष्ट्र सैनिक तुमच्याकडे (चर्चेला ) येतील. 

या विषयांत जसा आम्ही तुमच्याशी संवाद साधतोय तसंच एक पत्र आम्ही सरकारला पण पाठवलं आहे. हिंदी भाषेच्या किंवा एकूणच तिसऱ्या भाषा शिकवली जाणार नाही याचं लेखी पत्र हवं असं आम्ही सरकारला ठासून सांगितलं आहे. ते पत्र काढतील किंवा न काढतील, पण तुम्ही या बाबतीत सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करणार असाल तर हा आम्ही महाराष्ट्र द्रोह समजू हे नक्की…

महाराष्ट्रात या भाषा लादण्याच्या प्रकरणाबाबत प्रचंड असंतोष आहे हे आपण ध्यानात ठेवावे ! 

बाकी आपण सुज्ञ आहातच ! अधिक काय लिहीणे ! 

आपला 

राज ठाकरे ।


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here