मुंबई,दि.१४: राज्यातील २९ महापालिकांकरिता उद्या (दि.१५) मतदान होणार आहे. लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. ईव्हीएम मशीनला नवीन डिव्हाइस जोडण्यात येणार असल्याचा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना(ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी तातडीची संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भारतीय निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “निवडणूक आयोग पारदर्शक राहिलेला नाही, ते सत्ताधाऱ्यांचे गुलाम झाले आहेत,” अशा शब्दांत राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.
निवडणूक आयोगाने मंगळवारी ५वाजता प्रचार संपल्यानंतर उमेदवारांना घरोघरी जाऊन लोकांना भेटण्याची परवानगी दिल्याने राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे. हारलेली गोष्ट जिंकण्यासाठी निवडणूक आयोग मदत करत आहे असा थेट आरोप राज ठाकरेंनी केला आहे. हा जर जुना नियम असेल तर विधानसभा, लोकसभा किंवा त्याच्या आधीच्या निवडणुकांमध्ये का केलं नाही? अशी विचारणाही राज ठाकरेंनी केली आहे. राज ठाकरे यांनी शिवतीर्थवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेही त्यांच्यासोबत होते.
“काल ५ वाजता प्रचार थांबला आणि आपण ज्या काही निवडणुका इतकी वर्ष पाहत आहोत त्यात निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर दुसरा दिवस रिकामा आणि नंतरच्या दिवशी मतदान ही आतापर्यंतची प्रथा आजपर्यंत होती. या सरकारला काय हवं आहे यासाठी निवडणूक आयोग काम करत आहे,” असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे.
राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत खळबळजनक दावा केला की, निवडणूक आयोग EVM मशीनला एक नवीन ‘डिव्हाइस’ (उपकरण) जोडणार आहे. या तांत्रिक बदलाबाबत आयोगाने कोणत्याही राजकीय पक्षाला विश्वासात घेतलेले नाही किंवा तशी पूर्वकल्पना दिलेली नाही. हे नवीन मशीन नेमके दिसते कसे, याचे काम काय आणि ते ऐनवेळी का जोडले जात आहे, याचे उत्तर आयोगाकडे नाही,” असे राज ठाकरे म्हणाले.
प्रिटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट, पाडू नावाचे नवीन मशीन ईव्हीएमला जोडले जाणार आहे. हे नवीन काय युनिट आणले आहे ते आम्हाला माहिती नाही, जनतेलाही माहिती नाही असे राज ठाकरे म्हणाले.
निवडणूक आयोगाने पाडू नावाची नवीन मशीन आणली आहे पाडू. Printing Auxiliary Display Unit. या बाबत कुठल्याही पक्षाला कल्पना दिलेली नाही. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून याबाबत निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाकडून मनमानी कारभार सुरू आहे. वाघमारे याबाबत उत्तर द्यायला तयार नाहीत. आताच्या सरकारने हा वाघ कधीच मारून टाकला आहे म्हणून त्यांच्याकडून काही अपेक्षा नाही. या कोणत्या गोष्टी महाराष्ट्रात सुरू आहेत? निवडणुकीच्या तोंडावर रोजच्या रोज हे कायदे बदलत आहेत. पत्रकार म्हणून तुम्ही सुद्धा याबाबत त्यांना तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत. जनेतेनेही याबाबत प्रश्न विचारले पाहिजेत. असेही मनसे अध्यक्ष म्हणाले.








