Raj Thackeray MNS: राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर कारवाई, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

0

सोलापूर,दि.२३: Raj Thackeray MNS: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बुधवारी गुढीपाडवा मेळावादरम्यान माहीम भागातील समुद्रात अनधिकृत बांधकाम झाल्याचं म्हणत एक व्हिडीओ दाखवला होता. तसेच हे बांधकाम एका महिन्यात न हटवल्यास त्याठिकाणी गणपती मंदीर बांधू, असा इशाराही त्यांनी दिला होता. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, याप्रकरणी आता कारवाई करण्यात आली असून महापालिकेकडून हे बांधकाम पाडण्यात आले आहे.

राज ठाकरे यांनी दिला होता इशारा | Raj Thackeray MNS

तत्पूर्वी राज ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी (मुंबई शहर) हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. यासाठी सहा अधिकाऱ्यांचं एक पथक नियुक्त करण्यात आलं होतं. त्यानुसार आज सकाळपासून हे अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू झालं आहे. यासाठी कर्मचाऱ्यांचं पथक माहीम दर्गाच्या ठिकाणी पोहोचलं असल्याची माहिती वृत्तवाहिनीने दिली आहे. तसेच या ठिकाणी मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

अनधिकृत बांधकामावर कारवाई झाल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे आणि राज्य सरकारचे अभिनंदन केले आहे. बऱ्याचशा गोष्टी सरकार पर्यंत पोहचू शकत नाहीत. मात्र राज ठाकरे यांच्यामुळे ही बाब निदर्शनास आली व त्यानंतर त्यावर तातडीने कारवाई करण्यात आली, त्यामुळे राजसाहेब ठाकरे यांचे अभिनंदन असे बावनकुळे म्हणाले.

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अनधिकृत मजार, मशीद व धार्मिक स्थळांवर कारवाई केली जाईल असे एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here