राज ठाकरे महाराष्ट्राच्या मातीतील एक चांगला वक्ता: जितेंद्र आव्हाड

0

नवी मुंबई,दि.२२: राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राज ठाकरे महाराष्ट्राच्या मातीतील एक चांगला वक्ता आहेत असे म्हटले आहे. ते नवी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. राज ठाकरेंनी पुण्यातील सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर (Sharad Pawar) टीका केली. राज ठाकरेंनी शरद पवार यांना औरंगजेब सुफी संत वाटतो असा आरोप केला. यावर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय. शरद पवार औरंगजेबाला कधीही सुफी संत म्हटले नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं. तसेच राज ठाकरेंच्या डोक्यात घुसवलेला पुरंदरेंचा इतिहास त्यांच्या तोंडातून बाहेर येतो आहे, असं मत व्यक्त केलं.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “शरद पवार औरंगजेबाला कधीही सुफी संत म्हटले नाही. शरद पवार यांना काय वाटतं हे राज ठाकरे यांनी ठरवू नये. तुम्हाला काय वाटतं हे सांगा. त्यांच्या डोक्यात घुसवलेला पुरंदरेंचा इतिहास तोंडातून बाहेर येतो आहे. त्या इतिहासावर आता महाराष्ट्राचा विश्वास नाही.”

राज ठाकरे चांगले वक्ते

जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंच्या वक्तृत्वाबद्दल कौतुक करत ते लवकर बरे होण्याची प्रार्थनाही केली. ते म्हणाले, “राज ठाकरेंनी अयोध्येला जावं, द्वारकेला जावं, कुठेही जावं. आम्हाला त्याबद्दल काहीही करायचं नाही. त्यांनी जे कारण दिलंय की तब्येत बरी नाही. ते महाराष्ट्राच्या मातीतील एक चांगला वक्ता आहे.”

“ते चांगलं भाषण करतात. त्यांच्यात आणि माझ्यात मुद्द्यांमध्ये मतभेद असू शकतात, पण त्यांच्या वक्तृत्वकलेबद्दल माझ्या मनात शंका नाही. ते चांगले वक्ते आहेत. त्यांना लवकर आराम पडो हीच मी देवाचरणी प्रार्थना करेल,” असंही आव्हाड यांनी नमूद केलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here